हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक

हिवाळी पाडा शाळेचे शिक्षणमंत्र्यांकडून कौतुक
Published on

मुंबई, ता. २३ : राज्यातील शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि स्वच्छतेच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज दुर्गम आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवाळी पाडा (ता. त्र्यंबकेश्वर) येथील विद्यार्थ्यांशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रयोगशाळाच ठरत आहे. येथे शिक्षण केवळ वर्गखोल्यांपुरते मर्यादित नसून निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवाधारित पद्धतीने दिले जाते. विशेष म्हणजे, ही शाळा सकाळी ९ ते रात्री ९ अशा तब्बल १२ तास विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, वर्षभर सातत्याने विविध शैक्षणिक आणि कौशल्याधारित उपक्रम राबविले जातात. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली.
शाळेत शेती, परसबाग, पर्यावरण संवर्धन, श्रमसंस्कार आणि प्रयोगात्मक शिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे शिक्षण अधिक आनंददायी, उपयुक्त आणि जीवनाभिमुख बनले आहे. या वेळी शाळेतील शिक्षक केशव गावीत यांच्या उपस्थितीत शिक्षणमंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अध्ययनाची माहिती घेतली. तसेच विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.

स्वच्छता, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण
शाळेतील स्वच्छता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबतही त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे व्यवस्थित कापलेले केस, स्वच्छ गणवेश, कापलेली नखे तसेच स्वच्छ आणि सुंदर शालेय परिसर पाहून त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्वच्छता आणि शिस्त या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मूलभूत बाबी असून, प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संवाद उपक्रम
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचावे, शाळांमध्ये सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनासोबतच स्वच्छता व शिस्तीच्या सवयी दृढ व्हाव्यात, यासाठी अशा प्रकारचे नियमित आढावे आणि संवाद उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com