मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले
Published on

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले
कुलाब्यात २४७, तर सांताक्रूझमध्ये २२४ मिमीची नोंद

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २४ : शहर आणि उपनगरांतील नागरिकांना गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. ठिकठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रेल्वेसह रस्ते वाहतूक बाधित होऊन लाखो नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. महापौरांच्याच दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्याने महापालिकेचे नालेसफाईसह मॅनहोलवर झाकणे बसवल्याचे दावे फोल ठरले.
मागील १२ तासांत कुलाबा हवामान केंद्रात २४७.८ मिमी आणि सांताक्रूझ केंद्रात २२४.८ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांतील मालवणी येथे सर्वाधिक ३४० मिमी, तर शहर भागातील एफ/दक्षिण विभागात ३३४ मिमी पाऊस पडला. रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सक्कर पंचायत, गांधी मार्केट, दादर टीटी, सायन सर्कल तसेच उपनगरांतील कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मालाड आणि बोरिवली या सखल भागांमध्ये पाणी साचले होते. महापालिकेने तातडीने उदंचन पंप आणि मनुष्यबळाचा वापर करून पाण्याचा निचरा केला. या कालावधीत मुंबईत विविध ठिकाणी आपत्कालीन घटनांची नोंद झाली. शहर व उपनगरांत एकूण ७० ठिकाणी शॉर्टसर्किट झाले, तर ११३ ठिकाणी झाडे किंवा फांद्या कोसळल्या. तसेच सात ठिकाणी घराच्या भिंतींचे किरकोळ भाग पडले. पालिका आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मुसळधार पावसामुळे काही काळ रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला फटका बसला. अनेक भागांत रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होऊन बसचा खोळंबा झाला. पावसाने दुपारी उघडीप घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्येही पावसाचा जोर चांगला आहे.
...
पुढील २४ तासांत वादळी पाऊस
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी मुंबईत मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
...
महापौरांच्या दौऱ्यातच कर्मचारी मॅनहोलमध्ये
मुंबई ः मुंबईच्या महापौर रितू तावडे, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा लवाजमा सायनच्या गांधी मार्केट परिसरात पावसाळी पाहणी करीत असताना महापालिकेचा उत्तर विभागातील तिथे कर्तव्यावर असलेला एक कर्मचारी पाय घसरून थेट उघड्या मॅनहोलमध्ये कोसळला. यामुळे उपस्थितांची तारांबळ उडाली. नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याला बाहेर खेचले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली नसली, तरी याने पालिकेच्या ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश केला आहे. या अपघाताचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, मुंबईकरांमधून संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
...
विरोधकांची घणाघाती टीका
कर्मचारी थेट उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण कमालीचे तापले असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महापौरांवर घणाघाती टीका करताना सांगितले, की विरोधकांना घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देण्यापूर्वी आपल्यासमोर खड्ड्यात पडलेल्या त्या माणसाकडे पाहा. तो माणूस तुमच्या निष्क्रियतेच्या आणि भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात पडला आहे. हा केवळ अपघात नाही, तर पालिकेचा भ्रष्टाचार रंगेहाथ पकडला गेला आहे. ​दुसरीकडे उपमहापौर संजय घाडी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे स्थानके, शाळा आणि रुग्णालयांच्या परिसरातील सर्व मॅनहोल्सचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
​...
पालिकेचे दावे फोल
​एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून नालेसफाई आणि मॅनहोलवर जाळ्या बसवल्याचे दावे केले जात असताना, पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची दाणादाण उडाली. याप्रकरणी आता दोषी अधिकाऱ्यांवर आणि निष्काळजी करणाऱ्या कंत्राटदारांवर पालिका काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
...
तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळित
मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने मुंबईच्या उपनगरी रेल्वेची चांगलीच परीक्षा घेतली. ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे-कोपरखैरणे स्थानकांदरम्यान रुळाखालची गिट्टी वाहून गेल्याने खड्डा पडला आणि सुरक्षेच्या कारणास्तव सकाळच्या गर्दीच्या वेळेत सुमारे दोन तास ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरही मोठा परिणाम दिसून आला.
दिवसभरात ३९ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक गाड्या २० मिनिटांहून अधिक विलंबाने धावत होत्या. परिणामी लाखो प्रवाशांना गर्दी, विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागला. बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील तुर्भे ते कोपरखैरणे स्थानकांदरम्यान रुळाखालची गिट्टी वाहून गेल्याचे निदर्शनास आले. सुरक्षिततेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने सकाळी ५.५० वाजता अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेतली. सुमारे एक तास ४५ मिनिटांनंतर सकाळी ७.३५ वाजता वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून या विभागात ३० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा लागू करण्यात आल्याने दिवसभर लोकल सेवेवर परिणाम जाणवत राहिला. ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद झाल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळेत अनेक प्रवाशांना ठाणे, वाशी आणि नवी मुंबई परिसरातून पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा ताण निर्माण झाला. बस स्थानके आणि शेअर रिक्षा स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोकलच्या ३९ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. पश्चिम रेल्वेवर काही लोकल गाड्या २० मिनिटांहून अधिक उशिराने धावत होत्या.
...
प्रवाशांचे हाल
लोकल सेवेत झालेल्या विलंबाचा मोठा फटका कार्यालयीन वेळेत प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना बसला. अनेकांना कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये वेळेत पोहोचता आले नाही. काही प्रवाशांना फलाटांवर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली, तर अनेकांनी गर्दीमुळे पर्यायी वाहतुकीचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com