

कोकण मंडळाच्या भूखंडाच्या मागणीला सरकारकडून वाटण्याच्या अक्षता
म्हाडाने पत्र देऊन वर्ष झाले तरी प्रतिसाद नाही; जागेअभावी नवीन प्रकल्प हाती घेण्यावर मर्यादा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : सर्वसामान्यांसाठी महामुंबईत जास्तीत जास्त परवडणारी घरे उभारता यावीत, यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने केलेल्या ३५० हेक्टर जमीनीच्या मागणीला राज्य सरकारने वाटण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये प्रस्ताव दिला असून दोन वेळा स्मरणपत्रे दिली आहेत. तरीही कोणतीच हालचाल होत नसल्याने सरकारला कोकण मंडळाच्या भूखंड मागणीचा विसर पाडला असेल का, अशी चर्चा म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. तसेच भूखंड नसल्याने नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यावर मर्यादा येत आहेत.
मुंबईतील घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या असल्याने सर्वसामान्यांकडून ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, वसई, विरारमध्ये तुलनेने स्वस्त असलेल्या घरांना पसंती दिली जात आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने २०२५ मध्ये काढलेल्या ठाणे, नवी मुंबईतील ५,३६२ घरांच्या लॉटरीतील प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल एक लाख ८४ हजारहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घराला मोठी पसंती दिली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच भाग म्हणून कोकण मंडळाकडून आणखी गृहनिर्माण योजना राबवण्याचे नियोजन आहे; मात्र सध्या कोकण मंडळाकडे परवडणाऱ्या घराचे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी जागाच नसल्याने सरकारने आणखी जागा द्यावी, अशी मागणी कोकण मंडळाने केली होती. येथील घरांना असलेली मागणी पाहता सरकारने तत्काळ निर्णय घेणे अपेक्षित होते. त्याबाबत पाठपुरावा करूनही अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.
आधी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार
कोकण मंडळाकडे सध्या घरे बांधण्यासाठी जागेची चणचण आहे. त्यामुळेच सरकारकडे जागेची मागणी केली आहे. ही जागा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ घरे उभारणे शक्य नाही. या भूखंडाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिन्या, ड्रेनेज सिस्टीम अशा पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास त्या उभाराव्या लागतील. त्यामुळे सरकारने जमीन दिल्यानंतरही घरे तत्काळ उभारता येत नाहीत. त्यामुळे जेवढ्या लवकर भूखंड उपलब्ध होतील तेवढ्या लवकर घरे उभारणे शक्य होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
म्हाडाने मागणी केलेले भूखंड
पनवेल
- आडीवली - ६.३ हेक्टर
- उसरली - १.१७ हेक्टर
- पनवेल - १३.४ हेक्टर
ठाणे
- कळवा - १८.५३ हेक्टर
- चिखलोली - ४.४५ हेक्टर
- खिडकाळी - ९.६३ हेक्टर
- दापोडे - २६.०७ हेक्टर
- बापगाव - ३६.७५ हेक्टर
- ठाणे - १५.२७ हेक्टर
- ठाणे - ३९ हेक्टर
- माजिवडा - १३ हेक्टर
पालघर
- वसई - ४.६६ हेक्टर
- जूचंद्र - २० हेक्टर
- नंडोरे - ६.१७ हेक्टर
- पालघर - ११.५१ हेक्टर
- पालघर - ८९.५९ हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.