टिटवाळा ब्लॉकचा प्रवाशांना ‘लेटमार्क’

टिटवाळा ब्लॉकचा प्रवाशांना ‘लेटमार्क’
Published on

टिटवाळा ब्लॉकचा प्रवाशांना ‘लेटमार्क’
४० ते ५० मिनिटे उशिराने धावल्या लोकल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : टिटवाळा स्थानकातील १५ डब्यांच्या लोकलसाठी सुरू असलेल्या फलाट विस्ताराच्या कामाचा परिणाम शुक्रवारी (ता. ४) सकाळच्या लोकल सेवेवर झाला. ब्लॉकच्या आठव्या दिवशी कल्याण-कसारा मार्गावरील अनेक लोकल ४० ते ५० मिनिटे उशिराने धावल्या. त्यातच पाच अप आणि चार डाऊन अशा नऊ फेऱ्या रद्द करण्यात आल्याने पुढील गाड्यांवरील प्रवासी संख्या वाढली. परिणामी, टिटवाळा ते मुंबईदरम्यानच्या सेवेला मोठा फटका बसला.
टिटवाळा स्थानकावर १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे काम मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. त्यासाठी २८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान रात्री ११.३० ते पहाटे ५.१० या वेळेत विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. शुक्रवारी ब्लॉकचा आठवा दिवस होता. रात्रीच्या कामानंतर सकाळच्या सेवांवर त्याचा परिणाम जाणवला. सकाळी ६नंतर लोकलच्या फेऱ्यांमध्ये विलंब वाढत गेला. टिटवाळा, खडवली, आसनगाव आणि कल्याण येथील प्रवाशांना गाड्यांसाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली. रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे पुढील लोकलमध्ये गर्दी वाढली. या सेवांचा परिणाम पुढे ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला आणि दादरपर्यंत जाणवला. कल्याणमार्गे कर्जत आणि खोपोलीकडे जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. सकाळच्या वेळेत झालेल्या विलंबामुळे कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना वेळेत इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. काही प्रवाशांनी जलद लोकल, बस तसेच अन्य पर्यायी वाहतुकीचा आधार घेतला. टिटवाळा फलाट विस्ताराचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ डब्यांच्या लोकलसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत; मात्र कामाच्या उर्वरित कालावधीत लोकल वाहतूक कमीतकमी परिणामासह सुरू ठेवण्याचे आव्हान मध्य रेल्वेसमोर आहे.
...
तीन रात्री पहाटे ५ वाजेपर्यंत ब्लॉक
टिटवाळा फलाट विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारच्या मध्यरात्रीपासून सोमवारच्या पहाटेपर्यंत दररोज रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत विशेष वाहतूक आणि विद्युत ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत टिटवाळा-कसारादरम्यानची लोकल सेवा बंद राहणार असून, अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी रात्री ९.२०, तर कसाऱ्यासाठी ९.३२ वाजता शेवटची लोकल सुटेल. ब्लॉक संपल्यानंतर सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी पहिली लोकल पहाटे ४.१९ वाजता सुटेल. कसाऱ्याहून सीएसएमटीसाठी ४.५९, तर टिटवाळ्याहून ५.११ वाजता पहिली लोकल धावेल. ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी-टिटवाळा मार्गावरील काही लोकल ठाणे किंवा कल्याणपर्यंतच चालविण्यात येतील. त्यामुळे टिटवाळा-कसारा परिसरातील प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
...
लोकल पकडताना दोन प्रवासी जखमी
कळवा कारशेडकडे जाणारा प्रवाशांचा अनधिकृत मार्ग रेल्वे प्रशासनाने भिंत आणि प्रवेशद्वार उभारून बंद केला आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० वर्षांपासून या मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांनी आता धावती लोकल पकडण्यासाठी धोकादायक मार्गांचा अवलंब सुरू केला आहे. शुक्रवारी कारशेडची लोकल पकडण्याच्या प्रयत्नात दोन प्रवासी खाली पडून जखमी झाले. गर्दीच्या काळात लोकल पकडण्याचा हा धोकादायक प्रकार प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण करीत आहे. अनधिकृत मार्ग बंद करताना प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com