धावत्या लोकलमध्ये रंगला गोकुळाष्टमीचा उत्सव

धावत्या लोकलमध्ये रंगला गोकुळाष्टमीचा उत्सव
Published on

धावत्या लोकलमध्ये
गोकुळाष्टमीचा उत्सव
महिला डब्यात दहीहंडी फुटली; पाळणा सजवून ‘गोपालकृष्ण’चा जयघोष

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईची लोकल म्हटली की गर्दी, धावपळ आणि कामावर पोहोचण्याची घाई... मात्र, गोकुळाष्टमीच्या निमित्ताने याच धावत्या लोकलमध्ये भक्तीचा रंग पाहायला मिळाला. बदलापूर-ठाणे लोकलच्या महिला डब्यात महिलांनी दहीहंडी फोडत गोपाळकाल्याचा जल्लोष केला. पाळणा सजवून श्रीकृष्णाचा जन्मोत्सवही साजरा करण्यात आला. या उत्सवाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
महिला डब्यात महिलांनी छोटेखानी पाळणा सजवला होता. श्रीकृष्णाला पाळण्यात ठेवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी महिलांनी भक्तिगीते म्हणत ‘गोपाळकृष्ण भगवान की जय’चा जयघोष केला. नाचत-गात आनंद व्यक्त केल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली. काही क्षणांसाठी रोजच्या प्रवासातील धावपळ बाजूला सारून महिला डब्यात गोकुळातील उत्सवासारखे वातावरण निर्माण झाले.
मुंबईच्या लोकलमध्ये सण साजरे होण्याची परंपरा जुनी आहे. मकर संक्रांत, धूलिवंदन, रक्षाबंधन यांसारख्या सणांनंतर आता गोकुळाष्टमीचाही उत्सव लोकलच्या डब्यांमध्ये रंगताना दिसला. पश्चिम रेल्वेच्या सामान्य डब्यातही प्रवाशांनी एकत्र येत कृष्णजन्म साजरा केला. सण-उत्सवांची परंपरा जपणाऱ्या मुंबईकरांची उत्सवप्रियता यानिमित्ताने पुन्हा दिसून आली.

Marathi News Esakal
www.esakal.com