कारागृहात २१ किलो वजन घटले

कारागृहात २१ किलो वजन घटले
Published on

कारागृहात २१ किलो वजन घटले

व्यावसायिकाला वैद्यकीय जामीन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : पुण्यातील एका ५९ वर्षांच्या व्यावसायिकाचे दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत कोठडीत असताना २१ किलो वजन कमी झाले. वारंवार आरोग्याच्या समस्या उद्‌भवू लागल्याची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन त्याला जामीन मंजूर केला. या व्यावसायिकाला कोठडीतच ठेवल्यास त्यांची प्रकृती आणखी बिघडू शकते, असे निरीक्षणही न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवले.

राधा मोहन मिश्राला कारावासाच्या ७० दिवसांत पुणे आणि मुंबईतील पाच रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्याची वैद्यकीय स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे न्या. मिलिंद जाधव यांनी नमूद केले. तसेच कोठडीतील त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचा घटनाक्रम एखाद्या सामान्य आणि समंजस व्यक्तीलाही अस्वस्थ करणारा असल्याचेही न्यायालयाने जामीन मंजूर करणाऱ्या आदेशात म्हटले.

पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात याचिकाकर्त्याला १७ जूनला अटक केली होती. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन कायद्यांतर्गत विविध कलमांतर्गत आरोप ठेवले आहेत. याचिकाकर्त्यावर नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी’ शस्त्रक्रिया झाली होती. त्यात त्याच्या पोटाचा ८० टक्के भाग काढून टाकण्यात आला होता. त्याला द्रव किंवा अर्ध-द्रव स्वरूपातील आहार घेणे आवश्यक होते. त्यानंतर याचिकाकर्त्याला ऑटोइम्यून आजार, यकृताचा जुनाट आजार आणि इतर व्याधींचे निदान झाल्याचे याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन कोठडीत याचिकाकर्त्याला उलट्या होणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, निर्जलीकरण आणि थकवा यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले, असे त्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाने नमूद केले.
---
तुरुंगवास हा अपवाद!
४८ दिवसांत याचिकाकर्त्याचे २१ किलो वजन घटल्याची बाब न्यायालयाने लक्षात जामीन मंजूर करताना घेतली. सरकारी पक्षाने याचिकाकर्त्याच्या जामिनाला विरोध केला; मात्र याचिकाकर्त्याला कोठडीत किंवा कारागृहात ठेवल्यास त्याची प्रकृती आणखी बिघडण्याचा धोका आहे. जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास हा अपवाद आहे, या तत्त्वाचाही दाखला एकलपीठाने याचिकाकर्त्याला जामीन मंजूर करताना दिला.

Marathi News Esakal
www.esakal.com