

गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ रवाना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली ‘मोदी एक्स्प्रेस’ शुक्रवारी (ता. ११) दुपारी दादर स्थानकातून सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण काही मिनिटांत फुल्ल होते. त्यामुळे चाकरमान्यांना प्रवासाचे नियोजन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे खासगी वाहनांचा वाढलेला खर्चही अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरतो. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांसाठी मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना कोकणात सहज पोहोचता यावे, यासाठी हा उपक्रम गेल्या १४ वर्षांपासून राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाच्या उद्देशाने विशेष गाडीची व्यवस्था करण्यात आली असून, या प्रवासाचा खर्च राणे यांनी स्वखर्चातून केल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आजच्या पहिल्या गाडीनंतर दुसरी ‘मोदी एक्स्प्रेस’ रविवार, १३ सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली. मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल गणेशभक्तांनी राणे यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.