

शिवाजी पार्कवर ठाकरेंचीच डरकाळी
दसरा मेळाव्यासाठी महापालिकेची ठाकरे गटाला परवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) होणाऱ्या यंदाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने ठाकरे गटाला या मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, यंदा या मैदानासाठी ठाकरे गटाव्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा अर्ज आला नसल्याने महापालिकेने तत्काळ ही मंजुरी दिली.
शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. यंदाच्या मेळाव्यासाठी ठाकरे गटाने सुमारे दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता. ‘दसरा मेळाव्यासाठी अन्य कोणताही दावा किंवा अर्ज न आल्यामुळे प्रशासकीय नियमांनुसार ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे,’ अशी माहिती जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांनी दिली. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यावरून प्रचंड राजकीय हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. दोन्ही गटांकडून मैदानावर दावा सांगण्यात येत असल्याने वाद न्यायालयापर्यंत गेला होता. तसेच इतर काही संघटनाही अर्ज करत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापत असे. मात्र, यंदा कोणताही राजकीय कलगीतुरा न रंगता शांततेत आणि थेट ठाकरे गटाला ही परवानगी मिळाली आहे. या मंजुरीमुळे येत्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर पुन्हा एकदा ठाकरेंचीच डरकाळी घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.