पंचतारांकित हॉटेलच्या जेवणाच्या टेबलावर झुरळ

पंचतारांकित हॉटेलच्या जेवणाच्या टेबलावर झुरळ
Published on

पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलावर झुरळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : उपनगरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणादरम्यान टेबलावर झुरळ आढळल्याची घटना समोर आली आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि फोर्टिस हेल्थकेअरचे अध्यक्ष डॉ. अशोक सेठ यांच्या जेवणाच्या टेबलावर झुरळ आढळले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करीत डॉ. सेठ यांनी हॉटेलच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले असून, अन्न व औषध प्रशासनाकडेही या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी केली आहे.

डॉ. अशोक सेठ हे मुंबईत सुमारे ३०० डॉक्टरांना गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टीचे प्रशिक्षण देण्यासाठी सहारा येथील जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेलमध्ये आले होते. या प्रशिक्षणासाठी त्यांच्यासोबत तीन परदेशी तज्ज्ञही उपस्थित होते. दिवसभराचे प्रशिक्षण सत्र संपल्यानंतर शनिवारी रात्री ते सहार येथील जे. डब्ल्यू. मॅरियटमधील रोमानो रेस्टॉरंटमध्ये सहकाऱ्यांसोबत जेवणासाठी गेले होते. जेवण सुरू असताना त्यांच्या टेबलावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांच्या भांड्यांच्या आसपास एक छोटे झुरळ फिरताना दिसले. डॉ. सेठ यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो ‘एक्स’वर अपलोड केला आणि त्याला अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण तसेच हॉटेल व्यवस्थापनाला समाजमाध्यमावर टॅग केले. उपरोधिक शैलीत त्यांनी ‘रोची’ नावाचा हा पाहुणा त्यांच्यासोबत रात्रीचे जेवण करण्यासाठी आल्याचे म्हटले. झुरळ दिसल्यानंतर जेवण करण्याची इच्छा राहिली नाही आणि अर्धवट जेवण सोडून रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्याचे डॉ. सेठ यांनी सांगितले.

बुफेमध्येही झुरळ आढळल्याचा दावा
डॉ. सेठ यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी मांडण्यात आलेल्या बुफेमध्येही झुरळ आढळले होते. या घटनेनंतर हॉटेल व्यवस्थापनाच्या प्रतिसादाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तक्रार केल्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक घटनास्थळी आले नसल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळाने आचारी तेथे आले आणि त्यांनी माफी मागितल्याचेही डॉ. सेठ यांनी नमूद केले. हॉटेल व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता, लँडलाइनवरून बोलणाऱ्या कर्मचाऱ्याने लवकरच हॉटेलची संबंधित टीम या प्रकरणावर अधिकृत निवेदन देईल, असे सांगितले. दरम्यान, बातमी प्रसिद्ध होईपर्यंत हॉटेल व्यवस्थापनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com