रखरखत्या ऊन्हात ‘जेन झी’चा जोश

रखरखत्या ऊन्हात ‘जेन झी’चा जोश
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : रखरखीत ऊन आणि घामाच्या धारा लागलेल्या असतानाही शिवाजी पार्क परिसरात जमलेल्या ‘जेन झी’चा तोच जोश आणि तोच उत्साह होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी केलेल्या आंदोलनाप्रमाणेच आजही शिवाजी पार्क परिसरात हजारोंच्या संख्येने तरुणाईने उपस्थिती लावली होती. तसेच रखरखीत ऊन असतानाही दुपारपासूनच शिवाजी पार्कच्या दिशेने जाणारे रस्ते तरुणाईच्या गर्दीने भरून गेले होते. निमित्त होते, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी केलेल्या आंदोलनाचे.

ज्ञानेशकुमार सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक प्रक्रियेत गोलमाल करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्यासाठी काक्रोच जनता पार्टीने सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात जोरदार आंदोलन करत राजीनाम्याची मागणी केली. मोबाईलच्या स्क्रीनवर जग पाहणारी ‘जेन झी’ पिढी आज प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली होती आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपला जोश दाखवून दिला. दुपारपासूनच शिवाजी पार्क, छत्रपती परिसर आणि आसपासच्या रस्त्यांवर तरुण-तरुणींची गर्दी वाढू लागली होती. डोक्यावर टोपी, खांद्यावर बॅग, हातात पाण्याच्या बाटल्या आणि घोषणांचे फलक घेऊन ही तरुणाई जाथ्ये येत होते. समाज माध्यमांवर केलेल्या आवाहनावर ही गर्दी जमली होती.

ना मोठा नेता, ना व्यासपीठ
या गर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे आंदोलनासाठी कोणताही मोठा नेता नाही, कोणतेही नावाजलेले व्यासपीठ नाही. प्रत्येकजण देशाचे भवितव्य, लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि सरकारची धोरणे यावर पोटतिडकीने व्यक्त होत होते. फेसबुक, इन्स्टाग्राम लाईव्ह, रिल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश थेट जगभर पोहोचवला जात होता

मुंबईकरांसाठी वेगळे चित्र
सोशल मीडियावर ट्रेंड होणारी ‘जेन झी’ आज प्रत्यक्ष मैदानात ट्रेंड झाली. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसणाऱ्या मुंबईकरांसाठी हे वेगळे चित्र होते. ऊन उतरल्यानंतरही गर्दी कमी झाली नाही, उलट वाढतच गेली. हा केवळ गर्दीचा आकडा नव्हता, तर नव्या पिढीच्या सजगतेचा आणि सहभागाचा पुरावा होता.

पोलिसांची सहकार्य भूमिका
तरुणाईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात सकाळपासूनच मोठा बंदोबस्त लावला होता, मात्र पोलिसांनी प्रधान यांच्या आंदोलनावेळी तरुणाईची अडवणूक केली होती. काही ठिकाणी लाठीचार्ज केल्यानंतरही ‘जेन झी’ ऐकत नसल्याने पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली होती. तोच कित्ता आज पोलिसांनी पुन्हा गिरवत आंदोलकांना अटकाव न करता सहकार्याची भूमिका घेतल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com