मुंबईतील आंदोलनाला ठाकरे बंधूंचे बळ

मुंबईतील आंदोलनाला ठाकरे बंधूंचे बळ
Published on: 

मुंबईतील आंदोलनाला ठाकरे बंधूंचे बळ
सेना भवन परिसरात तणाव; पोलिसांची धावपळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी आणि डाव्या संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या वणव्याची धग रविवारी (ता. ११) मुंबईत जाणवली. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे हे तिन्ही ठाकरे बंधू रविवारी रस्त्यावर उतरल्याने हे आंदोलन अचानक पेटले. पोलिस काही आंदोलकांना गाडीतून घेऊन शिवसेना भवनच्या दिशेने जात असताना आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीला घेराव घातला आणि गाडी रोखून धरली.
दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलन होण्याची शक्यता असल्याने शनिवारपासून परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. रविवारी दुपारपासूनच शिवाजी पार्क आणि सेना भवन परिसरात आंदोलक जमण्यास सुरुवात झाली. वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात फौजफाटा असूनही आंदोलकांना रोखण्यात पोलिसांची तारांबळ उडत होती. आंदोलक हातात पोस्टर घेऊन केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात घोषणा देत होते. पोलिसांनी या आंदोलकांना उचलून ताब्यात घेतले.
----
पोलिसांची गाडी अडवली
आंदोलकांना घेऊन जाणारी गाडी शिवसेना भवन परिसरातून  जात होती. त्याच वेळी आदित्य आणि तेजस ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अचानक पोलिसांच्या गाडीला घेराव घातला. गाडीत कोंबलेल्या आंदोलकांना सोडण्यासाठी तिन्ही ठाकरे अडून बसले. आदित्य ठाकरे यांनी तर पोलिसांच्या गाडीवर चढून घोषणा दिल्या. अमित ठाकरे आणि तेजस ठाकरे हेदेखील गर्दीत ठाण मांडून उभे होते. त्यामुळे या आंदोलनाला अचानक जोर चढला. ‘सीजेपी’च्या या आंदोलनात ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने अत्यंत साधे वाटणारे आंदोलन अचानक पेटले.
----
शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या
दरम्यान, आंदोलनात अग्रणी असणारे संदीप देशपांडे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे तिन्ही ठाकरे बंधू हे शिवाजी पार्क पोलिस ठाण्याबाहेर जाऊन ठिय्या देऊन बसले. पोलिस त्यांना हटवण्याचा प्रयत्न करीत होते, पण कोणीही हटण्यास तयार नव्हते. थोड्या वेळाने आदित्य आणि अमित ठाकरे बाहेर आले. सर्व आंदोलकांची सुटका केल्याची माहिती दिल्यावर आंदोलकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट करीत पोलिस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com