मुंबईच्या समुद्रात डिझेल तस्करीचा संशय; मासेमारी नौका ताब्यात पाठलागादरम्यान ५०० लिटर डिझेल समुद्रात फेकले; सहा मोबाईल जप्त, संयुक्त तपास सुरू

मुंबईच्या समुद्रात डिझेल तस्करीचा संशय; मासेमारी नौका ताब्यात   पाठलागादरम्यान ५०० लिटर डिझेल समुद्रात फेकले; सहा मोबाईल जप्त, संयुक्त तपास सुरू
Published on: 

मुंबईच्या समुद्रात डिझेल तस्करीचा संशय
मासेमारी नौका ताब्यात; ५०० लिटर डिझेल फेकले, संयुक्त तपास सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मध्य समुद्रात डिझेलची तस्करी होत असल्याचा संशय आल्याने भारतीय तटरक्षक दलाने ‘हरिद्वार कृपा’ ही मासेमारी नौका ताब्यात घेतली. यातून सुमारे चार हजार लिटर डिझेलची अवैध वाहतूक केल्याची प्राथमिक माहिती आहे. तटरक्षक दलाच्या पथकाने केलेल्या पाठलागादरम्यान पुरावा नष्ट करण्यासाठी सुमारे ५०० लिटर डिझेल समुद्रात फेकल्याची कबुली नौकेच्या कप्तानने दिली आहे.
मुंबई किनारपट्टीवरील संशयास्पद सागरी हालचालींवर लक्ष ठेवताना तटरक्षक दलाच्या जहाजांना प्रॉन्ग्स दीपगृह परिसरात एका व्यापारी जहाजाजवळ मासेमारी नौका आढळली. तटरक्षक दलाने सागरी संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून नौकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र नौकेवरील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. वारंवार सूचना देऊनही नौका थांबली नाही. उलट तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तटरक्षक दलाच्या जहाजाने पाठलाग करून नौका ताब्यात घेतली.

चार हजार लिटर डिझेल घेतल्याची कबुली
नौकेच्या तपासणीसाठी तटरक्षक दलाच्या विशेष पथकाने झडती घेतली. प्राथमिक चौकशीत नौकेच्या कप्तानने समुद्रातच सुमारे चार हजार लिटर डिझेल घेतल्याचे सांगितले. तटरक्षक दलाच्या जहाजाने पाठलाग सुरू केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुमारे ५०० लिटर डिझेल समुद्रात फेकल्याचेही त्याने कबूल केले. या कारवाईत नौकेशी संबंधित कागदपत्रे आणि सहा मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.

विविध यंत्रणांकडून संयुक्त तपास
ताब्यात घेतलेली नौका, तिच्यावरील कर्मचारी आणि जप्त केलेले साहित्य मुंबई बंदरात आणण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, राज्य गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिस यांच्या सहभागातून संयुक्त तपास सुरू करण्यात आला आहे. डिझेलच्या कथित तस्करीमागील साखळी, त्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि या व्यवहाराचे स्वरूप यांचा तपासातून उलगडा होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com