राज्य शिक्षक पुरस्कारांचा शिक्षण विभागाला विसर?

राज्य शिक्षक पुरस्कारांचा शिक्षण विभागाला विसर?
Published on: 

राज्य शिक्षक पुरस्कारांचा शिक्षण विभागाला विसर?
मुलाखती पूर्ण होऊन दोन महिने उलटले; अंतिम यादीची प्रतीक्षा
मुंबई, ता. २५ : दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील गुणवंत शिक्षकांचा राज्य शिक्षक पुरस्काराने गौरव केला जातो, मात्र यंदा शिक्षक दिन उलटून महिना झाला, तरी शालेय शिक्षण विभागाकडून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६ संदर्भात घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाला राज्य शिक्षक पुरस्कारांचा विसर पडला आहे काय, असा सवाल शिक्षकवर्गातून उपस्थित होत आहे.

शिक्षक पुरस्कारांसाठी जिल्हा आणि राज्यस्तरीय मुलाखतींची प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण झाली. त्यामुळे त्यानंतर लवकरच अंतिम निवड यादी जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र मुलाखती पूर्ण होऊन बराच कालावधी उलटला आणि ५ सप्टेंबरचा शिक्षक दिनही पार पडला, तरी पुरस्कारांची अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठीची निवड प्रक्रिया पूर्णत्वाच्या टप्प्यावर असताना अंतिम यादी जाहीर करण्यास नेमका विलंब कशामुळे होत आहे, याबाबतही शिक्षण विभागाकडून स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मानाची अपेक्षा बाळगणाऱ्या शिक्षकांची प्रतीक्षा आता नाराजीमध्ये बदलत आहे. २०२४-२५ या वर्षातील राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानंतर, तब्बल १८ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली होती. त्या वेळी १०९ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली होती. शिक्षक दिनाच्या दिवशीच गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्याची संधी हुकल्यानंतरही यंदा परिस्थितीत सुधारणा झालेली दिसत नाही.


शिक्षकांना प्रतीक्षा
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर रोजी करण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी शिक्षक दिनाचे औचित्य साधले जात असताना, राज्यातील गुणवंत शिक्षकांच्या पुरस्कारांची घोषणा मात्र रखडणे, ही विसंगती मानली जात आहे. पुरस्कारांसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या आणि निवड प्रक्रियेतील विविध टप्पे पूर्ण केलेल्या शिक्षकांना आता अंतिम घोषणेची प्रतीक्षा आहे. निवड यादी कधी जाहीर होणार, पुरस्कार वितरण सोहळा कधी आयोजित केला जाणार आणि यंदा झालेल्या विलंबामागील नेमकी कारणे काय, याबाबत मोठा संभ्रम असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com