

टॅबच्या दर्जावरून भाजप आक्रमक!
विद्यार्थ्यांना चांगली उपकरणे देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या टॅबलेट आणि डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनेल्सच्या दर्जावरून भाजपने शिक्षण विभागाला लक्ष्य केले आहे. विद्यार्थ्यांना अनोळखी कंपन्यांची उपकरणे देण्याऐवजी नामांकित जागतिक कंपन्यांची दर्जेदार डिजिटल साधने उपलब्ध करून द्यावीत, तसेच शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचार आणि साटेलोट्याची चौकशी करावी, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याच्या उपक्रमाचे स्वागत करतानाच साटम यांनी उपकरणांच्या गुणवत्तेबाबत आक्षेप नोंदवले आहेत. विद्यार्थ्यांना दिले जाणारे टॅब प्रमाणित दर्जाचे नसून नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचेही नाहीत, असा दावा त्यांनी केला. शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनेल्सच्या दर्जाबाबतही तक्रारी असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
काही कंपन्या कमी दर्जाची उपकरणे चढ्या दराने पुरवीत असल्याचा संशय व्यक्त करत या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी करण्याची मागणी साटम यांनी केली. महापालिकेने गेल्या काही वर्षांत अनोळखी कंपन्यांच्या टॅबवर केलेल्या खर्चाच्या तुलनेत नामांकित कंपन्यांचे टॅब बाजारात जवळपास त्याच किमतीत उपलब्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिक्षण विभागातील काही व्यक्तींची मक्तेदारी असल्याचा आरोप करत साटम यांनी शाळांच्या भूखंडांसाठीच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणाच्या निर्मितीतील त्यांच्या कथित भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. हे धोरण आता रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
...
नामांकित कंपन्या निवडा!
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अनुसरून भारतात उत्पादन करणाऱ्या जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्यांचीच उपकरणे खरेदी करावीत, अशी मागणी त्यांनी केली. अशा उपकरणांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार डिजिटल शिक्षण मिळण्यासोबतच विक्रीनंतरची सेवाही अधिक चांगली मिळेल, असे साटम यांनी पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.