

मुंबईच्या समुद्रातही होर्डिंगचा विळखा
तरंगत्या जाहिरात फलकांना विरोध; समुद्री जैवविविधतेला धोका असल्याचा पर्यावरणप्रेमींचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबईच्या समुद्रात तरंगते जाहिरात फलक उभारण्याच्या प्रस्तावामुळे शहराच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबरच समुद्री पर्यावरणाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या फलकांसाठी वापरण्यात येणाऱ्या एलईडी दिव्यांमुळे समुद्री जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, प्रकल्प राबवण्यापूर्वी त्याच्या पर्यावरणीय परिणामांचा शास्त्रीय अभ्यास करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमार संघटनांकडून होत आहे.
मुंबईच्या समुद्रात तरंगते होर्डिंग उभारण्याच्या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य विद्रूप होण्याबरोबरच समुद्री पर्यावरणालाही धोका निर्माण होण्याची शक्यता पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमार संघटनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांना परवानगी देण्यापूर्वी त्यांचे पर्यावरणीय परिणाम तपासण्याची मागणी होत असून, पुढे या विषयावर संघर्ष उभारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी समुद्रात तरंगते जाहिरात फलक उभारण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे अनेक भागांतून समुद्राचे दर्शनही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत समुद्रातही मोठ्या जाहिराती उभारल्यास नागरिकांना निसर्गाऐवजी जाहिरातीच पाहाव्या लागतील, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, समुद्रात जाहिरात फलक उभारण्याच्या प्रस्तावामुळे शहराचे सौंदर्य, समुद्री जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पाबाबत सरकार काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
या प्रकल्पातील एलईडी दिव्यांच्या वापरामुळे समुद्री जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामांबाबतही चिंता व्यक्त होत आहे. या प्रकल्पाला परवानगी देण्यापूर्वी शास्त्रीय अभ्यास करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. एलईडी दिव्यांच्या प्रकाशामुळे समुद्री जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचे परिणाम तपासल्यानंतरच सरकारने निर्णय घ्यावा.
- देवेंद्र तांडेल, अध्यक्ष
अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती
कोणतेही क्षेत्र आता प्रदूषणापासून दूर राहिलेले नाही. पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही, अशा प्रकारचे प्रकल्प सरकारकडून अपेक्षित असताना निसर्गाला बाधा आणणारे प्रकल्प राबवले जात असल्याचे दिसते. तरंगत्या होर्डिंगमुळे मुंबईच्या समुद्रातही प्रदूषणाचा धोका वाढू शकतो.
- गिरीश राऊत, पृथ्वी संरक्षण चळवळीचे निमंत्रक
कंत्राटदारांच्या आर्थिक हितापेक्षा शहराचे नैसर्गिक सौंदर्य जपण्याला प्राधान्य द्यावे. या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून तो थांबवावा.
- आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.