

शस्त्रास्त्रांसह युद्धकौशल्याचे दर्शन;
मुंबईकरांनी अनुभवले लष्करी सामर्थ्य!
कुलाबा मिलिटरी स्टेशनवर ‘नो युअर आर्मी’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : अत्याधुनिक ड्रोन, मशीनगन, आधुनिक तोफा आणि रडार यंत्रणा... प्रत्यक्ष शस्त्रास्त्रे हाताळण्याची संधी आणि युद्धभूमीवरील जवानांच्या कौशल्याची प्रात्यक्षिके... अशा अनुभवातून मुंबईकरांना भारतीय सैन्याचे सामर्थ्य जवळून जाणून घेता आले. कुलाबा मिलिटरी स्टेशन येथे २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पार पडलेल्या ‘नो युअर आर्मी’ या तीन दिवसीय प्रदर्शनाला शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
‘नो युअर आर्मी’ उपक्रमात अत्याधुनिक ड्रोन, आधुनिक बंदुका आणि मशीनगन यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. विशेष म्हणजे अभ्यागतांना काही शस्त्रास्त्रे प्रत्यक्ष हाताळण्याची संधी देण्यात आली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या शस्त्रास्त्रांची माहिती घेतली. स्वदेशी बनावटीच्या ड्रोनचे तंत्रज्ञान आणि युद्धभूमीवरील त्यांचा वाढता वापर याविषयी जवानांनी सविस्तर माहिती दिली. आधुनिक युद्धात ड्रोन हे केवळ टेहळणीचे साधन न राहता प्रभावी युद्धसामग्री बनले आहे. त्यामुळे या ड्रोनच्या कार्यपद्धतीविषयी नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. हाताने वाहून नेता येणाऱ्या तोफा, आधुनिक मशीनगन, बोफोर्स तोफा आणि रडार यंत्रणा प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या शस्त्रास्त्रांची कार्यपद्धती, क्षमता आणि युद्धातील उपयोग यांची माहिती जवानांनी दिली. ड्रोनपासून रडार यंत्रणेपर्यंत विविध उपकरणांच्या माध्यमातून बदलत्या युद्धपद्धतींचे या वेळी दर्शन घडले. युद्ध केवळ शस्त्रांच्या ताकदीवर नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञान, अचूक नियोजन आणि जवानांच्या कौशल्यावरही अवलंबून असते, याबाबतची जाणीव या प्रदर्शनातून झाली.
युद्धभूमीवरील बचाव तंत्राचे प्रात्यक्षिक
युद्धात जवान गंभीर जखमी झाल्यास त्याचे प्राण कसे वाचवावेत, याबाबतची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक हल्ल्यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, कोणती संरक्षक साधने वापरावीत, याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे आधुनिक युद्धातील आव्हाने आणि त्यासाठी सैन्याची तयारी यांची प्रत्यक्ष ओळख अभ्यागतांना झाली. शस्त्रास्त्रांबरोबरच जीव वाचवण्याच्या तंत्रालाही सैन्यात किती महत्त्व आहे, हे या प्रात्यक्षिकांतून अधोरेखित झाले.
लष्करी कौशल्यांनी रंगत
लष्करी बँडचे सादरीकरण, ड्रोन प्रात्यक्षिके, बेयोनेट फायटिंग, लष्करी मार्शल आर्टस्, तायक्वांदो आणि खुकरी नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. चेंडू मेलम आणि मल्लखांबाच्या सादरीकरणालाही उपस्थितांनी प्रतिसाद दिला. याशिवाय सैन्यातील जवानांशी संवाद, प्रेरणादायी चित्रफिती आणि विविध कृती-आधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना लष्करी जीवनातील शिस्त, सांघिक कार्य, शारीरिक क्षमता आणि समर्पणाची जवळून ओळख झाली.
नागरी-लष्करी संबंध दृढ
भारतीय सैन्य आणि नागरिकांमधील संवाद वाढवणे, तरुणांना सैन्यसेवेकडे आकर्षित करणे आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करणे हा या प्रदर्शनामागील उद्देश होता. सैन्याचे कार्य, त्यातील आव्हाने आणि देशाच्या सुरक्षेसाठी जवानांचे योगदान याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. शस्त्रास्त्रांचे सामर्थ्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि जवानांचे कौशल्य यांचा एकत्रित अनुभव देणारे हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी विशेष ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.