दियाच्या व्हिडिओवरून स्थायी समितीत खडाजंगी

दियाच्या व्हिडिओवरून 
स्थायी समितीत खडाजंगी
Published on: 

दियाच्या व्हिडिओवरून
स्थायी समितीत खडाजंगी
अधिकाऱ्याच्या निलंबनाची काँग्रेसची मागणी; भाजपची सारवासारव
मुंबई, ता. ४ : अभिनेत्री दिया मिर्झा यांनी मुंबईतील प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी केलेला व्हिडिओ महापालिकेच्या समाजमाध्यमांवरून हटविण्यात आल्याचे प्रकरण बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत गाजले. काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. व्हिडिओ हटविण्याचे आदेश कुणी दिले, तो का हटविण्यात आला, असे विचारत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. या मुद्द्यावर भाजपच्या नगरसेवकांना स्पष्टीकरण देताना कसरत करावी लागली.
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेचे प्रभावी प्रयत्न होत नसल्याचा आरोप आझमी यांनी केला. काही जागरूक नागरिक स्वतःहून व्हिडिओ तयार करून प्रदूषणाविरोधात जनजागृती करतात. अभिनेत्री दिया मिर्झा यांनी महापालिकेसाठी मानधनाविना जनजागृतीचा व्हिडिओ तयार करून दिला होता. पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात महापालिकेने दिया मिर्झा यांचा गौरव केला होता. त्या वेळी कोणतीही हरकत नव्हती, मग आता त्यांचा व्हिडिओ हटविण्याची वेळ का आली, कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आला, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी आझमी यांनी केली.
दरम्यान, भाजपचे सभागृहनेते गणेश खणकर यांनी कोस्टल रोडसह विविध विकास प्रकल्पांबाबत दिया मिर्झा यांनी घेतलेल्या भूमिकेवर आक्षेप असल्याचे सांगितले. जनजागृतीचे कार्यक्रम करताना प्रशासनाने सत्ताधाऱ्यांना विश्वासात घेण्याची भूमिका आम्ही मांडली होती. या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रश्न नसून प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही खणकर म्हणाले.
----
दिया मिर्झाप्रकरणी न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाली. त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल.
- अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त
---
व्हिडिओ अद्याप गायबच
न्यायालयाचे निर्देश, स्थायी समितीत नगरसेवकांचा जाब आणि प्रशासनाला वारंवार विचारलेल्या प्रश्नानंतरही अभिनेत्री दिया मिर्झा यांचा प्रदूषणविरोधी जनजागृतीचा व्हिडिओ मुंबई महापालिकेच्या समाजमाध्यमावर पुन्हा झळकलेला नाही. न्यायालयाने व्हिडिओ पुन्हा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याने महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.