इलेक्ट्रॉनिक वस्तूंना महागाईचा झटका

इलेक्ट्रॉनिक वस्तूंना महागाईचा झटका
Published on: 

इलेक्ट्रॉनिक वस्तूंना महागाईचा झटका
एसीच्या किमतीत आठ ते १० टक्के; टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन ५ ते १० टक्क्यांनी महाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दिवाळीच्या खरेदीचा हंगाम संपत असतानाच एसी, टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या किमतीत वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादक कंपन्यांनी ऑक्टोबरपासून किमतीत वाढ केली आहे. एसीच्या किमतीत आठ ते १० टक्के, तर टीव्ही, फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या किमतीत ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. काही कंपन्यांनी उत्पादनांच्या श्रेणीनुसार वेगवेगळे दर लागू केले आहेत.
तांबे, ॲल्युमिनियम, स्टील, प्लॅस्टिक तसेच अन्य कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, पश्चिम आशियातील संघर्ष, डॉलरच्या तुलनेत रुपयातील चढ-उतार आणि मालवाहतुकीचा वाढलेला खर्च यामुळे कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.
ब्ल्यू स्टारने एसीच्या किमतीत सुमारे आठ टक्के, तर एलजीने पाच ते सात टक्क्यांनी वाढ केली आहे. हायरने एसीच्या किमतीत पाच टक्के वाढ लागू केली आहे. डायकिनने सप्टेंबरमध्येच किमतीत सहा ते १० टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. टीव्हीच्या किमतीतही वाढ झाली असून, सॅमसंगने विविध स्क्रीन आकारांच्या टीव्हीच्या किमतीत एक हजार ते १० हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
दिवाळीपूर्वी वितरकांनी जुन्या दराने खरेदी केलेला माल बाजारात उपलब्ध असल्याने काही ग्राहकांना सवलतींचा लाभ मिळाला. मात्र, जुन्या साठ्याची उपलब्धता कमी होत असल्याने नव्या दरांचा परिणाम आता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना विविध कंपन्यांचे दर, बँक ऑफर्स, ईएमआय आणि अंतिम विक्री किंमत तपासणे आवश्यक ठरणार आहे.

दरवाढीचा परिणाम
कंपन्यांकडून काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ग्राहक चौकशीसाठी येत असले तरी दरवाढीमुळे खरेदीचा निर्णय घेण्यास वेळ घेत आहेत, असे एका विक्रेत्याने सांगितले.

दिवाळीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढल्याने बजेट कोलमडले आहे. सणासुदीच्या काळात दर कमी होण्याऐवजी वाढत आहे. एअरबड आणि इतर गॅजेटच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
- तुषार गायकवाड, ग्राहक

टीव्ही आणि फ्रीज सर्वच महाग झाले आहे. वाढत्या किमती आणि इतर सणासुदीच्या खर्चामुळे खरेदीचे नियोजन बदलावे लागले आहे. आवश्यक वस्तूंची खरेदीही आता विचार करूनच करावी लागत आहे.
- अक्षय आनंददास, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.