

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
एक हजार ६६ जागांची वाढ; कर्नाटक पहिल्या क्रमांकावर
मुंबई, ता. ६ : पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने यंदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशात कनार्टकनंतर राज्याने दुसरे स्थान पटकावले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्यात पदव्युत्तर ब्रॉड स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या सात हजार ६१५ जागा उपलब्ध झाल्या आहेत. गतवर्षीच्या सहा हजार ५४९ जागांच्या तुलनेत यंदा एक हजार ६६ जागांची म्हणजेच १६.३ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) ६ नोव्हेंबर २०२६ रोजी अद्ययावत केलेल्या आसन मॅट्रिक्सनुसार, आठ हजार ८६२ जागांसह कर्नाटक देशात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र सात हजार ६१५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तमिळनाडू (६,६७८), उत्तर प्रदेश (६,६७५), तेलंगणा (४,४०३) आणि आंध्र प्रदेश (४,३०९) ही राज्ये त्यापाठोपाठ आहेत.
राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एमडी आणि एमएस अभ्यासक्रमांच्या जागांत २९ सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ७२० जागांची निव्वळ वाढ झाली आहे. यात उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वाधिक ७७ जागांची वाढ झाली. औरंगाबाद येथे ७३, सातारा येथे ६४, धुळे येथे ४४, तर अंबरनाथ येथे ४० जागा वाढल्या आहेत. कोल्हापूर आणि अंबाजोगाई येथे प्रत्येकी ३९, लातूर येथे ३८, नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात ३७, तर सोलापूर आणि जालना येथे प्रत्येकी ३५ जागांची वाढ झाली आहे. याशिवाय हिंगोली येथे ३२, मुंबईतील एल.टी. मार्ग येथे ३०, अलिबाग येथे २७, बारामती येथे २२ आणि नांदेड येथे १९ जागा वाढल्या आहेत. पुणे, नागपूर आणि यवतमाळ येथे प्रत्येकी १७, नंदुरबार येथे सात, गोंदिया येथे सहा, नाशिक येथे तीन, तर चंद्रपूर येथे दोन जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
----
विविध शाखांच्या जागांत वाढ
भूलशास्त्र, बालरोगशास्त्र, सर्वसाधारण औषधशास्त्र, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र, मानसोपचारशास्त्र, रेडिओडायग्नोसिस, अस्थिरोगशास्त्र यांसह शरीररचनाशास्त्र, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र आणि समुदाय वैद्यक अशा विविध शाखांमध्ये पदव्युत्तर जागा वाढल्या आहेत.
----
पदव्युत्तर प्रवेशक्षमतेतील वाढ ही उद्याच्या सक्षम आरोग्यव्यवस्थेचा पाया आहे. यामुळे राज्यात अधिक तज्ज्ञ डॉक्टर घडतील, वैद्यकीय संशोधनाला चालना मिळेल आणि शासकीय रुग्णालयांची उपचारक्षमता वाढेल. वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला प्रत्यक्ष बळ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.