झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरून वाद

झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरून वाद
Published on: 

झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरून वाद
‘एसआरए’च्या अधिकारांवर महापालिकेचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून विकास परवानगी देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अशा भूखंडांवरील विकास परवानगी देण्याच्या अधिकाराबाबत महापालिका आणि एसआरए यांच्यातील अधिकार क्षेत्राचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र पाठवून विकास नियंत्रण नियमावलीतील विनियम ३३ (११) अंतर्गत झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवर एसआरएकडून विकास परवानगी देण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याची विनंती केली आहे. भारतीय संविधानातील ७४व्या घटनादुरुस्तीनुसार शहरी भागातील नगर नियोजनाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. शहरातील नागरिकांना आवश्यक सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने नगर नियोजन आणि सेवा पुरवठा या दोन्ही बाबी परस्परांशी निगडित आहेत. त्यामुळे शहराच्या नियोजन प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे भिडे यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या कायद्यानुसार घोषित झोपडपट्टी क्षेत्रांच्या सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकासासाठी प्राधिकरणाला अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरही एसआरएच्या माध्यमातून विकास परवानगी देण्याच्या कार्यपद्धतीचा फेरविचार होणे आवश्यक असल्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता विनियम ३३ (११) अंतर्गत विकास परवानगीच्या अधिकारांबाबत काय भूमिका घेते, याकडे विकसकांसह बांधकाम क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.