

ई-२० पेट्रोल गुणवत्ता मानकांनुसार!
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचा दावा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : देशभरात पुरवठा करण्यात येणारे ई-२० पेट्रोल निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार असल्याचा दावा इंडियन ऑइल (आयओसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) या तीन सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी केला आहे. कर्नाटक सरकारने काही पेट्रोल पंपांवरील पेट्रोलमध्ये २६ ते ३१ टक्के इथेनॉल असल्याचा दावा केला असताना, संबंधित चाचण्यांच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८९३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. हे सर्व नमुने भारतीय मानक ब्युरोच्या ‘आयएस १७०२१’ या मानकानुसार निर्धारित १९ ते २१ टक्के इथेनॉलच्या मर्यादेत आढळले. कर्नाटकमधील ५६ नमुन्यांमध्ये इथेनॉलचे सरासरी प्रमाण १९.३० टक्के नोंदविण्यात आले. कर्नाटकातील ऑक्टोबरमधील तपासणीदरम्यान तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सहभागाशिवाय नमुने घेतल्याचा आक्षेप कंपन्यांनी नोंदविला आहे. तसेच नमुने संकलन, चाचणी पद्धती आणि प्रयोगशाळेचे अहवाल याबाबत आवश्यक तांत्रिक माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. ई-२० इंधनातील इथेनॉलचे प्रमाण तपासण्यासाठी भारतीय मानकांनुसार निर्धारित पद्धतींचे पालन आवश्यक असल्याचे कंपन्यांनी स्पष्ट केले. इंधन मिश्रणाची प्रक्रिया रिफायनरी आणि डेपोमध्ये स्वयंचलित यंत्रणेद्वारे नियंत्रित केली जाते, असेही त्यांनी सांगितले. वाहनांचे मायलेज आणि दुरुस्ती खर्चाबाबत करण्यात आलेल्या दाव्यांचे वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे मूल्यांकन करण्याची गरजही कंपन्यांनी व्यक्त केली.