

दिवाळी सुरू होऊनही कंत्राटी कामगार बोनसच्या प्रतीक्षेत!
महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित; म्युनिसिपल मजदूर युनियनची नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : दिवाळीचा सण सुरू झाला असतानाही मुंबई महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत रोजंदारी, बहुउद्देशीय आणि कंत्राटी कामगारांना अद्याप दिवाळी बोनस मिळालेला नाही. कायम कर्मचाऱ्यांच्या खात्यात २ नोव्हेंबर रोजी सानुग्रह अनुदान जमा झाले असताना, वर्षभर सेवा बजावणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, सीटीसी बोरीवली रुग्णालयातील कर्मचारी, आरसीएच-२, एनयूएचएम, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, अंशकालिक कर्मचारी, स्वच्छ मुंबई अभियान, समग्र शिक्षा अभियान तसेच क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे बोनस मंजुरीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महापालिकेच्या परिपत्रकानुसार किमान वेतनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनसपोटी ८.३३ टक्के म्हणजेच एका महिन्याच्या वेतनाइतकी रक्कम देण्याची तरतूद आहे. असे असतानाही प्रशासनाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचा आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनने केला आहे.
निषेध नोंदविण्याचा निर्धार
दिवाळीपूर्वी बोनस मिळण्याची अपेक्षा असताना केवळ आश्वासने मिळत असल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढत आहे.
याप्रकरणी युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी प्रशासनाने तातडीने बोनस मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा १३ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पणत्या लावून निषेध नोंदविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.