

मुंबईत रेल्वे स्थानकांत भाेजपुरीचा सूर
छठपूजेनिमित्त गाण्यांचे प्रसारण; प्रवासी, मराठी संघटनांचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईतील छठपूजा आयाेजनावरून सुरू असलेल्या वादात मध्य रेल्वेच्या स्थानकांवर भाेजपुरी गाणी लावल्याने ठिणगी पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आंबिवली, वडाळा, सानपाडा यांसह काही स्थानकांवर ध्वनिक्षेपकांवरून भोजपुरी गाणी ऐकवण्यात आल्याने मराठी-अमराठी वाद उफाळून आला आहे. या प्रकाराला आक्षेप घेतल्यानंतर काही स्थानकांवर ही गाणी थांबवण्यात आली. काही प्रवाशांनी उद्घाेषणा थांबवून रेल्वेने ही गाणी लावल्याचा आराेप केल्याने रेल्वेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
छठपूजेनिमित्त उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही स्थानकांवर भोजपुरी गाणी ऐकवली जात हाेती. काही ठिकाणी नियमित रेल्वे उद्घाेषणा थांबवून गाणी लावल्याची तक्रार प्रवाशांनी केली. वडाळा स्थानकावर नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवल्यानंतर तेथील गाण्यांचे प्रसारण थांबवण्यात आले. मराठी एकीकरण समितीनेही या प्रकाराचा निषेध करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. रेल्वे स्थानके ही मनोरंजनाची केंद्रे नसून लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची ठिकाणे आहेत याचे भान ठेवून रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारांमुळे प्रवाशांची गैरसाेय हाेणार नाही याची काळजी घ्यावी, अशी भूमिका कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सल्लागार शैलेश राऊत यांनी मांडली.
मराठी सणांना का वगळले?
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि मराठी भाषा दिनानिमित्तही स्थानकांवर मराठी गाणी वाजवावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्य भाषांच्या सणांचा आदर राखतानाच महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि परंपरांनाही स्थानकांवरील प्रसारणात समान स्थान मिळाले पाहिजे, असे संघटनांचे म्हणणे आहे.
----
प्रवाशांच्या तक्रारीनंतर आम्ही रेल्वे प्रशासनाला भोजपुरी गाण्यांचे प्रसारण बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर गाणी बंद करण्यात आली. मुळात कुणाच्या मागणीवरून ही गाणी वाजवली गेली?
- जितेंद्र पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना
----
भोजपुरी गाणी लावण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. परत असा प्रकार झाल्यास रेल्वेविरोधात आंदोलन करू.
- गोवर्धन देशमुख, अध्यक्ष, मराठी एकीकरण समिती
------
‘ओवाळिते भाऊराया’, ‘या वेड्या बहिणीची वेडी ही माया’ ही गाणी रेल्वे प्रशासन पटना, लखनौ, रायपूर स्थानकावर वाजवण्याची हिंमत करणार का?
- सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते
...
प्रवासी सुरक्षा आणि मूलभूत सुविधा देण्याऐवजी रेल्वेला भोजपुरी गाण्यांचे कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात का?
- माधुरी मांजरेकर, नगरसेविका, शिवसेना (ठाकरे गट)
----
अनेक दिवशी विषयानुरूप जिंगल्स आणि जनजागृतीपर संदेश प्रसारित केले जातात. छठपूजेच्या निमित्ताने विशेष गाड्या चालवण्यात येत असलेल्या सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या काही स्थानकांवर छठपूजेची गाणी लावली गेली. आवश्यक माहिती प्रसारित करण्याच्या वेळेव्यतिरिक्त उपलब्ध वेळेतच याचे प्रसारण केले जात आहे.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.