

नेहरूंच्या दूरदृष्टीने देशाची उभारणी
मोदींच्या कारभारावर राऊतांची टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळेच देश उभा राहिला आणि विकासाला गती मिळाली, शिवसेनेने कायम नेहरूंवर टीका केली आहे, मात्र आज बाळासाहेब ठाकरे हयात असते आणि त्यांनी मोदींचा कारभार पाहिला असता, तर त्यांनीही नेहरू हवे होते, असेच म्हटले असते,’ असे उद्गार शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. १३) काढले.
दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १३७व्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘भारत भाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला संजय राऊत यांच्यासह सुप्रिया सुळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी संजय राऊत म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांमार्फत नेहरूंचे प्रतिमाभंजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र कितीही प्रयत्न केले तरी नेहरू भारतीयांच्या हृदयात कायम राहतील. नेहरूंनी देशासाठी खऱ्या अर्थाने त्याग केला, आपली संपत्ती देशाला अर्पण केली.’ दुसरीकडे, पंतप्रधान मोदी स्वतःला फकीर म्हणवतात; मात्र त्यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कोणता त्याग केला, हे आजपर्यंत कळाले नाही, दुसरीकडे नेहरूंच्या त्यागाचे कौतुक वाटण्याऐवजी मोदींना त्यांचा राग येतो, अशी टीका राऊत यांनी केली. आज गरब्यामध्ये मुस्लिम बांधवाना मज्जाव केला जातो. त्यांनी दिवाळी साजरी करू नये, असे काहींना वाटते, ही परिस्थिती बघताना नेहरूंची आठवण होते, असे ते म्हणाले.
मोदींवर टीका
नेहरू हे व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रणेते होते. एकदा व्यंगचित्रकार शंकर यांनी नेहरूंचे टीकात्मक व्यंगचित्र काढले होते, मात्र नेहरूंनी दुसऱ्या दिवशी चहाला बोलावले. मोदी त्या वेळी असते, तर शंकर तुरुंगात असते, असा टोमणाही संजय राऊत यांनी लगावला. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी उपस्थित राहू नये, अशी भूमिका नेहरूंनी घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या वेगळ्या विचारांच्या नेत्यांनाही त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यांनी विरोधकांवर पाळत ठेवली नाही, त्यांच्या घरी पोलिस पाठवले नाहीत किंवा चौकशीचा ससेमिरा लावला नाही, असा टोमणाही राऊत यांनी लगावला.
चार दशकांनंतर टिळक भवनात
बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना पत्रकार म्हणून संजय राऊत पहिल्यांदा टिळक भवनात आले होते. तब्बल चार दशकांनंतर दुसऱ्यांदा टिळक भवनात आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील ही ऐतिहासिक वास्तू असल्याचे आवर्जून सांगितले. निवडणुकीच्या काळात नव्हेतर इतर वेळी मित्रपक्षात वैचारिक चर्चा व्हावी, या उद्देशाने राऊत यांना आमंत्रित केल्याचे आयोजक धनंजय शिंदे यांनी सांगितले.
आज जगभर युद्धाची परिस्थिती आहे, जवाहरलाल नेहरू जर आज असते, तर त्यांनी या युद्धात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित केली असती.
- कुमार केतकर, माजी खासदार
...
नेहरू हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. मोदींचा अपवाद वगळता नेहरूंनंतर झालेले सर्वच पंतप्रधान त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात.
- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.