विल्यम-केट यांची सचिनसह मुंबई सफर

विल्यम-केट यांची सचिनसह मुंबई सफर
Published on: 

विल्यम-केट यांची सचिनसह मुंबई सफर
गल्ली क्रिकेटचा घेतला आनंद, कटिंग चहा, स्ट्रीट फूडचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस केट मिडलटन यांनी सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारत शहराच्या अस्सल संस्कृतीचा अनुभव घेतला. या शाही जोडप्याच्या मुंबई सफरीत क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरही सहभागी झाला.
सचिनच्या साथीने विल्यम आणि केट यांनी बॅलार्ड इस्टेट परिसरात फेरफटका मारला. या वेळी त्यांनी मुंबईचा प्रसिद्ध कटिंग चहा, कुल्हड चहा आणि स्थानिक स्ट्रीट फूडचा आस्वाद घेतला. या अनौपचारिक भेटीमुळे त्यांच्या शाही दौऱ्याला मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा रंग चढला. तिघांनी हॅमिल्टन स्टुडिओलाही भेट दिली. त्यानंतर गल्ली क्रिकेटचा आनंद घेतला. सचिन तेंडुलकरने फलंदाजी करताना शानदार स्ट्रेट ड्राइव्ह लगावला, तर प्रिन्स विल्यम आणि केट यांनीही हातात बॅट घेत क्रिकेटचे कौशल्य आजमावले, मात्र एका चिमुकलीच्या गोलंदाजीवर दुसऱ्याच चेंडूवर प्रिन्स विल्यम क्लीन बोल्ड झाले. त्यांनी तत्काळ त्या मुलीशी हस्तांदोलन करून तिचे कौतुक केले. केट यांचीही विकेट पडली. त्यानंतर हसत त्यांनी ‘आपल्याला अजून सरावाची गरज आहे, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करू,’ अशी प्रतिक्रिया दिली.
विल्यम आणि केट यांचे मुंबईशी क्रिकेटचे नाते जुने आहे. २०१६ मध्ये भारताच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यादरम्यानही ते स्थानिक मुलांसोबत गल्ली क्रिकेट खेळले होते. दशकभरानंतर पुन्हा एकदा मुंबईत क्रिकेटचा आनंद घेत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, विल्यम आणि केट तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात अर्थशॉट प्राइज पुरस्कार सोहळा हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या सोहळ्यात सचिन तेंडुलकर, अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रामी मालेक सहभागी होणार असून, दिग्दर्शक करण जोहर सूत्रसंचालन करणार आहेत.
...
भुयारी मेट्रोने प्रवास
विल्यम आणि केट मिडलटन यांनी आज मुंबई मेट्रो-३ अर्थात भुयारी मेट्रोने प्रवास केला. विधान भवन स्थानकापासून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंत शाही जोडप्याने प्रवास करत मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) या शाही भेटीचे फोटो ‘एक्स’वर शेअर करत हा ॲक्वा लाइनसाठी गौरवाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या या प्रवासामुळे मुंबईच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे आणि आधुनिक भारताच्या विकासाचे दर्शन घडले, असेही स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.