बालकांना कडेवर घेऊन प्रवासी दीड तास रांगेत

बालकांना कडेवर घेऊन  
प्रवासी दीड तास रांगेत
Published on: 

बालकांना कडेवर घेऊन
प्रवासी दीड तास रांगेत

मुंबई विमानतळावर ‘इमिग्रेशन’साठी हाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान प्रवाशांना मोठ्या प्रतीक्षेचा सामना करावा लागत आहे. लहान बालकांना कडेवर घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगेची व्‍यवस्था आहे; मात्र तेथे अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना दीड तासांहून अधिक वेळ रांगेत ताटकळावे लागले. या गैरसाेयीबाबत प्रवाशांनी समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, लांब रांग टाळण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’ (एफटीआय-टीटीपी) या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले.

दुबईहून मुंबईत परतलेल्या एका प्रवाशाला गैरसाेयीला सामाेरे जावे लागले. याबाबत त्याने समाजमाध्यमावर तीव्र नाराजी व्‍यक्त केली आहे. पहाटे तीनच्या सुमारास त्याला कुटुंबासह इमिग्रेशनसाठी एक तास ४५ मिनिटे प्रतीक्षा करावी लागल्याचे त्याने म्हटले आहे. लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांसाठी असलेल्या रांगेत अधिकारी नसल्यामुळे मुलांना कडेवर घेऊन बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले. विमानतळावर योग्य इमिग्रेशन व्यवस्था आणि प्रवाशांसाठी मदत कक्षाचा अभाव असल्याची टीकाही त्याने केली आहे.
---
प्रशासनाकडून दखल
तक्रारीची दखल घेत मुंबई विमानतळ प्रशासनाने संबंधित प्रवाशाला उत्तर दिले आहे. इमिग्रेशनच्या लांब रांग टाळण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक इमिग्रेशन - ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम’ (एफटीआय-टीटीपी) या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले. या योजनेत प्रवाशांना जलद इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येते. विमानतळावर बायोमेट्रिक नोंदणीसाठी कर्मचारी मदत करतात. त्यासाठी विमानतळावरील दिशादर्शक फलकांचे अनुकरण करावे किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.