काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. विद्यार्थी बुडत असल्याचे समजताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने चौघे जण बचावले. या विद्यार्थ्यांवर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात तीन विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील संभाजी कॉलनी परिसरात साने गुरुजी विद्यालय आहे. या शाळेने रायगड जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन स्थळे पाहण्यासाठी सहल काढण्यात आली होती. दहावीच्या वर्गातील सुमारे ७८ विद्यार्थी व आठ शिक्षक असे ८६ जण शुक्रवारी (ता. ६ ) रात्री ११ वाजता एसटी बसमधून रायगड जिल्ह्याकडे रवाना झाले होते. मोरगाव, रांजणगाव, प्रतापगड, महाड येथील चवदार तळे, मुरूड येथील जंजिरा किल्ला अशी अनेक पर्यटनस्थळे बघून झाल्यावर सोमवारी (ता. ९) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काशीद येथील समुद्रकिनारी फिरण्यास आले होते.

समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद घेत असताना सहा विद्यार्थी समुद्रात पोहण्यास गेले; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. तुषार वाघ, कृष्णा पाटील व सायली राठोड, रोहन महाजन या विद्यार्थ्यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले; मात्र रोहन बेडवाल व प्रणव कदम या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी पंधरा वयोगटातील असून सर्व जण दहावीच्या वर्गात शिकत होते. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घाबरलेले विद्यार्थी रुग्णालयात दाखल
समुद्रात बुडत असलेल्या सहकारी विद्यार्थ्यांना बघून सबा शेख व रुचिता अमृतकर या विद्यार्थिनी भयभीत झाल्या होत्या. ते बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

काशीद समुद्रकिनारा ठरतोय जीवघेणा
जगाच्या नकाशावर रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनाऱ्याची नोंद आहे. त्यामुळे तो पर्यटकांच्या पसंतीला उतरत आला आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबई, पुणे औरंगाबादसह वेगवेगळ्या राज्यांतील, देश-विदेशांतील पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. किनाऱ्यावरील टेहळणी टॉवर जीर्ण झाले आहेत. किनारी पर्यटकांना सतर्क ठेवण्यासाठी सायरनचा अभाव आहे. तसेच अपुऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे किनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी पर्यटक येतात. परंतु प्रशासनाकडून आवश्‍यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्याचा फटका पर्यटकांना बसत आहे. दरवर्षी समुद्रकिनारी पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असतानाही याची प्रशासन गांभीर्याने दखल का घेत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.