काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

काशीद समुद्रात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

sakal_logo
By

अलिबाग, ता. ९ (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात पोहताना औरंगाबाद जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांचा सोमवारी (ता. ९) बुडून मृत्यू झाला. रोहन बेडवाल व प्रणव कदम असे मृतांचे नाव आहे. विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतल्याने अन्य चौघे जण बचावले. त्यांच्यावर अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात तीन विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाची सहल रायगड जिल्ह्यात आली होती. दहाव्या वर्गातील सुमारे ७८ विद्यार्थी व आठ शिक्षक असे ८६ जण शुक्रवारी (ता. ६ ) रात्री ११ वाजता एसटी बसने रायगड जिल्ह्याकडे रवाना झाले होते. विविध पर्यटनस्थळ पाहून झाल्यावर सोमवारी (ता. ९) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काशीद येथील समुद्रकिनारी फिरण्यास आले. त्यापैकी सहा विद्यार्थी समुद्रात पोहण्यास गेले; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. यापैकी तुषार वाघ, कृष्णा पाटील, सायली राठोड, रोहन महाजन या विद्यार्थ्यांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले; मात्र रोहन बेडवाल व प्रणव कदम या दोघांचा बुडून मृत्यू झाला. सर्व विद्यार्थ्यांचे वय सरासरी १५ वर्षे असून ते दहाव्या वर्गात शिकत होते. या प्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
---
विद्यार्थ्यी भयभीत
समुद्रात बुडत असलेल्या सहकारी विद्यार्थ्यांना बघून सबा शेख व रुचिता अमृतकर या विद्यार्थिनी भयभीत झाल्या. त्यांना बोलताही येत नव्हते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
---
काशीद समुद्रकिनारा ठरतोय जीवघेणा
पर्यटनाच्या दृष्टीने काशीद समुद्रकिनारा हा प्रसिद्ध आहे. सुटीच्या दिवशी या किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते; मात्र किनाऱ्यावर आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. किनाऱ्यावरील टेहळणी टॉवर जीर्ण झाले असून अपुऱ्या सुरक्षा रक्षकांमुळे सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसते. दरवर्षी समुद्रकिनारी पर्यटक बुडण्याच्या घटना घडत असतानाही याची प्रशासन गांभीर्याने दखल का घेत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.