
रानटी डुकराच्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू
मुरूड, ता. १९ (बातमीदार) : भालगाव परिसरातील जंगलात रानटी डुकरांसाठी लावलेल्या फासात अडकून ४ वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. १७) संबंधित बिबट्या फासात अडकल्याची माहिती प्रादेशिक वन विभागास मिळाली. त्यानुसार सर्व वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही पाचारण केले; परंतु यंत्रणा पोहोचेपर्यंत बिबट्याचा मृत्यू झाला.
भालगावपासून २०० मीटर अंतरावरील जंगल भागात मंगळवारी सकाळी बिबट्या फासात अडकला होता. फासात अडकल्यावर अधिक हालचाल केल्याने तो अधिक आवळला गेला. यामध्ये बिबट्याच्या कंबरेखालील भागही मोठ्या प्रमाणात अडकला गेला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून आपला अहवाल वनाधिकाऱ्यांना दिला आहे. मृत बिबट्याचे वय चार वर्षे असून, त्याचे वजन ४५ किलोच्या आसपास असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. बिबट्यासारख्या देखण्या आणि रायगडची शान असणाऱ्या प्राण्याचा असा अंत होणे दुर्दैवी असल्याचे वन्यजीवप्रेमी संदीप घरत यांनी सांगितले.