स्‍वच्‍छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्‍वच्‍छता
स्‍वच्‍छता

स्‍वच्‍छता

sakal_logo
By

जिल्‍हाभरात स्‍वच्छतेचा जागर
स्वच्छ शहर अभियानात एकवटले सारे

मुरूडमधून चार टन कचरा संकलित

मुरूड, ता. २७ (बातमीदार) ः मुरूड-जंजिरा नगरपरिषदेमार्फत मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सुमारे ४ टन कचरा गोळा करण्यात आला. एकदरा पुलापासून तवसाळकरवाडीपर्यंत समुद्र किनारी नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच
पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, शिक्षण मंडळ प्रशासकीय अधिकारी दीपाली दिवेकर, जंजिरा मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर प्रशांत गोजरे व तटरक्षक दल, वनविभाग आणि कोळी बांधव मोहिमेत सहभागी झाले होते. कचरा, प्लॅस्टिकची नगरपरिषदेने योग्‍य विल्हेवाट लावली.
मुरूड ः

...................

पेणमध्ये रस्‍त्‍यांनी घेतला मोकळा श्‍वास
नगरपालिकेचे स्वच्छता अभियान

पेण, ता. २७ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील शहरांसह गावांचे केवळ सुशोभीकरणच न करता स्वच्छ्ताही व्हायला हवी, या उद्‌देशाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा नगरप्रशासन अधिकारी श्याम शेट्टी यांच्या पुढाकाराने पालिका क्षेत्रातील अस्वच्छ जागा तसेच अनधिकृतपणे टपऱ्या हटविण्याची मोहीम शुक्रवारी पार पडली. पेण-खोपोली मार्गावरील धरमतर रोड ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या एक किमी रस्त्यावर स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले.
स्वच्छतेची जबाबदारी शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर शहारातील प्रत्‍येक नागरिकांनी आहे. आपल्या परिसराची दैनंदिन स्वच्छ्ता ठेवली पाहिजे तसेच दुकानाच्या बाहेर अनधिकृतपणे टपर्‌या, पत्रे टाकले असल्‍यास तातडीने काढावे, अशा सूचना मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी केल्‍या आहेत.
स्वच्छ्ता मोहिमेत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पेण पालिकेचे अधिकारी कांबळे, अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण, रेश्मा करंबेल आदींसह, विद्युत मंडळाचे कर्मचारी, डॉक्टर, वकील आदी उपस्थित होते. अभियानात रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील नाले, गटारे, दुभाजक आदी गोष्टींची साफसफाई करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना सुरक्षितरीत्‍या चालता यावे, यासाठी पदपथ मोकळे करण्यात आले. मुख्य रस्त्यावरील काही दुकानदारांनी स्वतःहून गटारावरील अनधिकृत बांधकाम, टपऱ्या हटवल्‍या. पालिकेकडून अशा प्रकारे नियमित कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी या वेळी व्यक्त केली.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण शहरात स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली, मात्र नागरिकांनी दैनंदिन जीवनात नेहमीसाठीच स्‍वच्छतेचा अवलंब करावा. घरातील कचरा घंटा गाडीतच टाकावा, कोणत्याही प्रकारच्या प्लास्‍टिक बाटल्‍या, पिशव्या किंवा इतर कचरा गटारात किंवा नाल्‍यात टाकू नये, आपले शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी पेण
----------------

माणगाव नगरपंचायतमार्फत स्वच्छता अभियान
स्वच्छ माणगाव, सुंदर माणगावचा दिला संदेश

माणगाव, ता.२६ (बातमीदार) ः संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संपूर्ण जगाला स्वच्छतेचा नारा दिला. त्यांचा आदर्श ठेवून देशात व राज्यात दरवर्षी स्वच्छता अभियान राबवले जाते. नगरपंचायतीतर्फे तालुक्याचे उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांच्या उपस्‍थितीत शुक्रवारी स्‍वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. अभियानासाठी माणगाव पोलिस परेड मैदानावर सकाळी ६ वाजता सर्वजण एकत्रित आले होते. यावेळी उपस्थित शासकीय अधिकारी-कर्मचारी, विविध क्षेत्रातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, वकील बार संघटना, व्यापारी वर्ग, नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई

कामगार, श्री सदस्य व नागरिकांनी वेगवेगळ्या तुकड्या करून स्वच्छतेला सुरुवात केली. यावेळी माणगाव तालुक्याचे तहसीलदार विकास गारुडकर, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, मुख्याधिकारी संतोष माळी, स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, नगरसेवक अजित तारळेकर, प्रशांत साबळे, नगरसेविका ममता थोरे, माजी स्वीकृत नगरसेवक हेमंत शेठ आदी उपस्थित होते.

माणगाव ः नगरपंचायतमार्फत स्वच्छता अभियानात सहभागी माणगावकर.


-------------------

खोपोलीतील परिसर चकाचक

खोपोली, ता. २७ (बातमीदार) ः खोपोलीतील अभियानांतर्गत पालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी , माजी लोकप्रतिनिधींसह विविध सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू व टोपली घेऊन सकाळी सात वाजल्‍यापासून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविली. मुख्य बाजारपेठ, समाज मंदिर रस्‍ता, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी दररोज विविध रहिवासी भाग, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, उद्यान, चौक आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. शुक्रवारी अभियानाच्या प्रारंभ करताना मुख्याधिकारी अनुप दुरे, ज्‍येष्ठ माजी नगरसेवक मोहन औसरमल, माजी आरोग्य सभापती माधवी रिठे, प्रिया जाधव, गुरुनाथ साठेलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खोपोली : स्वच्छता शपथ घेऊन अभियानाला सुरुवात करण्यात आली.

...............

पालीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई
पाली (वार्ताहर)ः पाली नगरपंचायत क्षेत्रातील गांधी चौक ते एसटी बस डेपो या ७०० मीटर अंतरावरील रस्त्यावरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे शुक्रवारी तोडण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा प्रणाली शेळके, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, मुख्याधिकारी विद्या येरूणकर, नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते. अस्वच्छ परिसर स्‍वच्छ करून अतिक्रमण हटाव अभियान राबवण्याच्या सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. योगेश म्‍हसे यांनी दिल्‍याने ही कारवाई करण्यात आली.

पाली ः शहरातील अतिक्रमण हटवण्यात आले.

-------------------

माथेरानमध्ये रस्ते स्वच्छता अभियान

माथेरान (वार्ताहर) ः नगरपरिषदेत रस्त्यालगतचे अतिक्रमण बाजूला करून स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली. रस्त्यालगत, जंगलात टाकलेल्या प्लास्टिकच्या तसेच काचेच्या सुमारे ३००ते ४०० प्लास्टिक बाटल्‍या उचलण्यात आल्या तसेच तीन ते चार गाड्या घोड्यांची लीदही उचलण्यात आली. यावेळी कस्तुरबा रस्‍ता चकाचक करण्यात आला. मुख्याधिकारी आणि प्रशासक वैभव गारवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मोहिमेत कार्यालयीन अधीक्षक प्रवीण सुर्वे, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत, पाणी पुरवठा अभियंता अभिमन्यू यळवंडे, लेखापाल अंकुश ईचके, कर विभागाचे प्रमुख सदानंद ईगळे, अन्सार महापुळे, ज्ञानेश्वर सदगीर, स्नेहा साखळकर, अजय साळुंखे, जयंत वर्तक तसेच नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेत माथेरान शहर स्वच्छ केले.