सुशोभीकरणाच्या कामामुळे गाळात वाढ

सुशोभीकरणाच्या कामामुळे गाळात वाढ

Published on

मुरूड, ता. ६ (बातमीदार) ः नगरपरिषदेमार्फत मुरूड समुद्रकिनारी सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र हे काम करताना मच्छीमारांना विश्‍वासात न घेतल्‍याने त्‍याचे आर्थिक नुकसान होत आहे. कामामुळे खाडीत वाळूचा साठा दिवसेंदिवस वाढत असल्याने खाडी बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पावसाळ्यात किनारी भागात मिळणारी शिवळ्या, कालव, बोईट, कालुटे आदी मच्छी मिळेनाशी झाली आहे. त्‍यामुळे सुशोभीकरणाचे काम बंद करावे, अशी मागणी स्‍थानिक मच्छीमारांनी होत आहे.
मासेमारी हेच मच्छीमारांचे उपजीविकेचे मुख्य साधन आहे. पावसाळ्यात खोली समुद्रात मासेमारी बंद असल्‍याने अनेकजण गोड्‌या पाण्यात, किनारी भागात मासेमारी करतात. मात्र मुरुड समुद्रकिनारा सुशोभीकरणाच्या कामामुळे तयार झालेला गाळ खाडी प्रवाहात वाहून जात असल्‍याने मासे मिळेनासे झाले आहे. याबाबत सरकारने दखल घ्यावी तसेच कोळी-मच्छीमार बांधवाकरिता एकदरा खाडीमध्ये ग्रोव्हन्स (दगडी पद्धतीचा) बंधारा त्वरित मंजूर करून काम सुरू करावे, जोपर्यंत बंधाऱ्यास मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत सुशोभीकरणाचे काम बंद करण्यात यावे, नाही तर जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही धनुर्धारी महादेव कोळी समाज व महादेव कोळी समाज, एकदरा आणि जय मल्हार महादेव कोळी समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भातील मुरूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. या वेळी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका शुभांगी करडे, माजी नगरसेवक पांडुरंग आरेकर, जगन्नाथ वाघरे, महेंद्र गार्डी, यशवंत सवाई, प्रकाश सरपाटील, चिंतामणी लोदी, धुर्वा व लोदी, मनोहर जंजिरकर आदी उपस्थित होते.

नौका गाळात
सुशोभीकरणाचे काम सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी वाळूचे उत्खनन होऊन संपूर्ण वाळू समुद्रात लोटली गेली आहे. यामुळे एकदरा खाडीजवळ होड्या लागतात, त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. एकदरा व मुरूड खाडीलगत एकूण चार मच्छीमार संस्था कार्यरत असून या संस्थेमध्ये यांत्रिक व बिगर यांत्रिक ३०० ते ४५० नौका आहेत. याच नौका मच्छीमारांचे उपजीविकेचे साधन आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.