फणसाड अभयारण्याचा ‘वन गौरव’

फणसाड अभयारण्याचा ‘वन गौरव’

फणसाड अभयारण्याचा ‘वन गौरव’
रानभेंड पाहण्यास पर्यटकांची पसंती
मुरुड, ता. १० (बातमीदार) : मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात सध्या एका विशिष्ट झाडाला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहे. या झाडाला चक्‍क वन गौरव असे वन विभागाकडून संबोधले जात आहे. भटकंती करणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण सध्या पसंतीस उतरले आहे.
कोकणातील नारळ- पोफळीच्या बागा, आमराईतून वाहणारा थंडगार वारा, काजू, फणसाची झाडे आदी वनसंपदेविषयी आपण ऐकत असतो. निसर्गाचा हिरवागार शालू नेसून समृद्ध अशा कोकणात वन, वन्यजीव व जैवविविधतेच्या अनेक घटकांच्या मोठ्या प्रमाणावर नोंदी आहेत. यामध्ये एक अचंबित करणारी बाब मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात आहे. फणसाड अभयारण्यात तब्बल ११.७७ मीटर वेढीचे विशालकाय वृक्ष आहेत. ज्याला ‘रानभेंड’ असे संबोधतात. रानभेंड हा वृक्ष विशाल असून यावर पक्ष्यांची घरटीसुद्धा असतात. उंच अशा झाडाबद्दल पर्यटकांना नेहमीच आकर्षण असून या वृक्षाखाली सेल्फी घेण्याचा मोह पर्यटकांना टाळता येत नाही. फणसाडच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे सहा ते सात किमी अंतरावर हे झाड आहे. भटकंती करणारे वन्यप्रेमी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. उंच वृक्षाचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. या रानभेंडचे महाकाय झाड निसर्गाचे वरदान आहेच, शिवाय पर्यटकांसाठी सेल्फी पॉईंटदेखील ठरतो आहे. फणसाड अभयारण्यातील उंच अशी ‘रानभेंड’ पाहण्यासाठी पर्यटकांची अधिक गर्दी होत आहे.
...... . .
पर्यटकांसाठी फणसाड अभयारण्य हे नेहमीच जैवविविधतेच्या कारणांनी तथा भौगोलिकदृष्ट्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. फणसाड अभयारण्यात आजमितीस १७ प्रकारच्या सस्तन प्राण्यांची नोंद आहे. तर राज्यप्राणी शेकरूचे दर्शन (मोठी खार) येथेच घडते. याशिवाय सांबर आणि पिसोरी तसेच रानससा, साळींदर, रानडुक्कर, मुंगूस, वानर, माकड, रानमांजर, तरस, कोल्हा, बिबट्या हे वन्यप्राणीही इथे आढळतात. उल्लेखनीय बाब म्हणजे ५० हून अधिक प्रकारच्या फुलपाखरांची या अभयारण्यात नोंद आहे.
......................
कोकणातील संपन्न वनसंपदा
आलापल्ली येथे साग वृक्षाची जोडी राम-लक्ष्मण म्हणून प्रसिद्ध आहे. ग्लोरी ऑफ आलापल्ली म्हणून गुगलवर प्रसिद्ध झाडाची वेढी ही ५.४५ मीटर आहे.
....................
फणसाड अभयारण्यातील जैवविविधतेची अनुभूती घेण्यासाठी निसर्ग अभ्यासकांसह पर्यटकांसाठी पर्वणी आहे. रानभेंड महाकाय वृक्षाला फणसाड वन गौरव संबोधल्यास वावगे ठरू नये.
-तुषार काळभोर, वनपरिक्षेत्र अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com