सावली-टोकेखार रस्‍त्‍यावर दरड कोसळली

सावली-टोकेखार रस्‍त्‍यावर दरड कोसळली

Published on

सावली-टोकेखार रस्‍त्‍यावर दरड कोसळली
वाहतूक ठप्प; रस्‍त्‍यावर दोन फूट पाणी

मुरूड, ता. ८ (बातमीदार)ः तालुक्यात शनिवारपासून पावसाने धुवांधार हजेरी लावल्यामुळे सखल भागातील घरात पाणी शिरल्याने उसरोली ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. भालगाव-आगरदांडा रस्त्यावर सावली-टोकेखारजवळ दरड कोसळल्‍याने वाहतूक ठप्प झाली होती तसेच मुरूड शहरात खतीब बंगल्याजवळील रस्‍त्‍यावर दोन फूट पाणी साचले होते तर लक्ष्मीखार गावात सखल भागात मध्यरात्री १२ ते २ च्या सुमारास काही घरांमध्ये पाणी शिरल्‍याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. खाजणात भराव टाकल्यामुळे दरवर्षी अतिवृष्टी झाली की ग्रामस्‍थांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने, जिल्ह्याधिकाऱ्यांनी मुरूड व अलिबाग तालुक्यातील शाळा, महाविद्यालये सोमवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तालुक्‍यात तब्बल २५५ मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाचा जोर कायम आहे.
सावली-टोकेखार रस्त्यावर रात्री दरड कोसळल्याचे वृत्त समजताच तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती निवारण पथक सज्ज झाली. जेसीबीच्या मदतीने मंडळ अधिकारी के. वाय. राठोड यांनी, रस्त्यावरील मलबा हटवण्याचे काम हाती घेतले आणि सकाळी दहाच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.

चिकणीत पुलाला भगदाड
मुरूड-अलिबाग रस्त्यावर चिकणी येथील पुलाला एका बाजून भगदाड पडल्‍याने काही काळ वाहतूक खोळंबली. मात्र एसटी व इतर वाहनांना एका बाजूने वाट करून देण्यात आल्याने वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. चिकणी येथील नंदकुमार दिवेकर यांची नदीत बैलगाडी वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. शिघ्रे गावातील नवीन मोरी जवळील तीन-चार घरांत रात्री पाणी शिरले होते. परंतु पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा झाल्याने नुकसान टळले.

उसरोलीतील घरांत पाणी
उसरोलीत काही घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरू करण्यात आल्‍याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तवर यांनी दिली. अलिबाग-मुरूड रस्त्यावरील कमकुवत पुलांचा विषय ऐरणीवर आला असून सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

छायाचित्र ः

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.