म्हसळा स्टेट बँकेत महावितरण सेवा ठप्प की ग्राहकांच्या सेवेंत होतात अडचणी,लाईट गेले की कर्मचारी-अधिकारी मोबाईल टॉर्चनी करतात कामगिरी.
स्टेट बॅंकेत टॉर्चच्या उजेडात कामकाज
म्हसळ्यात विजेचा खेळखंडोबा; ग्राहक अंधारात
म्हसळा, ता. २३ (बातमीदार) ः येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय नसल्याने मागील दीड ते दोन महिन्यांपासून अनेक वेळा बँकेचा कारभार हा विजेविना अडखळत सुरू आहे; परंतु ग्राहकांना समस्या निर्माण होऊ नये म्हणून बँकेतील कर्मचारी-अधिकारी मोबाईलवरील टॉर्चच्या साहाय्याने कामे करतात.
म्हसळा तालुक्याचा व्यवहार हा स्टेट बँक शाखेवरच अवलंबून आहे. या बँकेत शासकीय कर्मचारी, शिक्षक, महिला बचत गट, सर्व योजनांचा लाभ, विद्यार्थी शिष्यवृत्ती, व्यापारी, शेतकरी आणि अन्य खातेदार यांची संख्या मोठी आहे; परंतु म्हसळा शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्यातच स्टेट बॅंकेत जनरेटर किंवा इन्व्हर्टरची सोय नसल्याने ग्राहकांना दैनंदिन व्यवहारांत अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँकेतील मशिनरी बंद पडली की तत्काळ नवीन उपलब्ध करायची नाही, असे एका ग्राहकाने सांगितले. बॅंकेची रक्कम भरण्याची मशीन (सीडीएम) अनेक महिन्यांपासून बंद आहे; परंतु बॅंक व्यवस्थापनाने पर्यायी सोय केलेली नाही. ग्राहक या सर्व प्रकारामुळे बेजार झाले आहेत.
मी बॅंकेचा जुना ग्राहक आहे. म्हसळा शाखेत कर्मचारी-अधिकारी संख्या कमी आहे. बॅंकेत कार्यरत असलेले रक्कम भरणा मशीन अनेक महिन्यांपासून बंद आहे. स्थानिक अधिकारी वरिष्ठ कार्यालयाकडे आवश्यक तो पाठपुरावा करीत नाही का? वरिष्ठ अधिकारी ग्रामीण भागातील शाखा म्हणून दुर्लक्ष करतात, हा सुद्धा एक विषय होईल.
- सुनील उमरोटकर, निवृत्त शासकीय कर्मचारी