म्हसळा तालुक्यात पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
म्हसळा तालुक्यात पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
म्हसळा, ता. ४ (वार्ताहर) ः म्हसळा तालुक्यातील विविध गावांमध्ये यंदा दत्तजयंती उत्सव अत्यंत उत्साह, भक्तीभाव आणि पारंपरिक श्रद्धेने साजरा करण्यात आला. तोंडसुरे, खारगाव बुद्रुक, देवघरकोंड, निगडी, वारळ येथील स्वयंभू दत्त मंदिर तसेच पंचक्रोशीतील इतर गावांमध्ये दत्तजयंतीनिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानीच अनुभवायला मिळाली.
यंदाही तोंडसुरे ग्रामस्थ, महिला मंडळ तसेच मुंबईतील तोंडसुरे मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ गोविंद भायदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता काकड आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी अभ्यंग स्नान, अभिषेक, सात वाजता आरती, साडेअकरा वाजता महाआरती व तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यानंतर दुपारी तीन वाजता श्री दत्तगुरूंची पालखी गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणुकीसह काढण्यात आली. गावातील महिला, युवक, भक्तगण आणि मान्यवर मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले. सायंकाळी आणि रात्री साडेनऊ वाजता सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या भजनांनी कार्यक्रमाला अधिक भक्तिमय रंग चढवला.

