

खारगाव खुर्दमध्ये शेतकऱ्याच्या बैलाची चोरी
सातव्यांदा गोठ्यावर डल्ला
म्हसळा, ता. १२ (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द येथील सकलप परिसरात शेतकरी चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांच्या मालकीचा बैल चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी कांबळे यांनी म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांबळे यांनी नेहमीप्रमाणे आपला बैल जंगलात चरण्यासाठी सोडला होता; मात्र सायंकाळी गोठ्यात परत न आल्यानंतर शोधमोहीम राबवली असता बैलाचा मागमूस लागला नाही. सात दिवस उलटूनही बैल न सापडल्याने अज्ञात व्यक्तींनी त्याची चोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वीही कांबळे यांच्या मालकीची गुरे चोरीला जाण्याच्या सात घटना उघड झाल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक ताण सहन करावा लागत आहे. म्हसळा तालुक्यात गेल्या काही महिन्यांत गोठ्यांवर वाढत्या प्रमाणात डल्ले पडू लागले असून चरण्यासाठी गेलेले गोधन चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने शेतकरीवर्गांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, म्हसळा नगर पंचायतीच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
चौकट
शेतकऱ्यांचे नुकसान
गोधन चोरीच्या वाढत्या घटनांना रोखण्यासाठी स्पष्ट आणि कडक यंत्रणा नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून ग्रामीण भागात पशुधन संरक्षण ही आता महत्त्वाची कायदा- सुव्यवस्थाविषयक समस्या बनू लागली आहे.