माथेरानच्या राणीची पर्यटकांना भुरळ

माथेरानच्या राणीची पर्यटकांना भुरळ

अजय कदम, माथेरान
मुंबईमधील पारसी व्यापारी आदमजी पीरभाय यांनी १५ एप्रिल १९०७ मध्ये नेरळ येथून माथेरान जाण्यासाठी नारगेज ट्रॅक बनवून मिनीट्रेन सुरू केली. मिनी ट्रेन सुरू झाली, त्‍याला नुकतीच ११६ वर्षे पूर्ण झाली आहेत. शतकोत्तरी वाटचालीत मिनीट्रेनने अनेक स्‍थित्‍यंतरे पाहिली आहेत.
१८५७ मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्यूज मेलेट यांनी शोध लावल्यावर रामबागमार्गे माथेरानमध्ये ब्रिटिश अधिकारी येऊ लागले. थंड हवेचे ठिकाण म्हणून शोधलेल्या या ठिकाणी नंतरच्या काळात सरकारी कचेऱ्या सुरू झाल्या. १९०५ मध्ये माथेरान गिरिस्थान नगर परिषद, पोस्ट ऑफिस, टेलिग्राम केंद्र ब्रिटिशांनी सुरू केली. त्या काळी मुंबईहून पनवेल, चौक असे पुढे रामबागमार्गे चालत आणि घोड्यावर किंवा डोलीत बसून माथेरानला ब्रिटिश अधिकारी आणि मुंबईतील धनिक समजले जाणारे पारसी लोक यायचे. पुढे १८५४ मध्ये मुंबई-पुणे मार्गांवर रेल्वे सुरू झाला.
घोडा किंवा डोलीत बसून माथेरानला जाण्याचा मार्ग १८५७ मध्ये विकसित करण्यात आला. १९०० च्या दरम्यान मुंबईचे नगरपाल असलेले सर आदमजी पीरभाय आणि त्यांचा मुलगा हुसेन अब्दुल पीरभाय हे माथेरानला जाण्यासाठी नेरळ येथे आले असता अंधार झाला होता आणि त्यामुळे त्यांना माथेरान येथे जाण्यासाठी डोली उपलब्ध झाली नाही. तेव्हा पीरभाय पिता-पुत्राने माथेरान येथे जाईन तर ट्रेन घेऊनच जाईन, असा निर्णय घेतला. आणि आदमजी आणि त्यांचा इंजिनिअर मुलगा अब्दुल हुसेन पीरभाय यांनी नेरळ ते माथेरान या अत्यंत अवघड घाटातून रेल्वे नेण्यासाठी १९०१ मध्ये सुरवात केली आणि १५ एप्रिल १९०७ रोजी नेरळ-माथेरान या २१ किलोमीटर नेरोगेज मार्गांवर पहिली मिनीट्रेन सुरू झाली. रेल्वेच्या या कामाकरिता त्यांनी त्‍या काळी १६ लाख रुपये स्वतः खर्च करून मार्ग उभारला होता.
११६ वर्षांच्या वाटचालीत मिनी ट्रेनने अनेक स्थित्यंतरे पाहिली असून १९७२ मध्ये तीन वर्षे चाललेल्या रेल्वे संपात ही ट्रेनही बंद होती. त्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी माथेरान-नेरळ घाट रस्ता श्रमदान करून तयार केला आणि आज हाच एकमेव रस्ता माथेरान घाटरस्ता म्हणून ओळखला जातो. पूर्वी वाफेच्या इंजिनवर चालवली जाणारी मिनी ट्रेन आता डिझेलवर चालवली जाते. ट्रेनला आधी दोन बोगीमध्ये ब्रेक पोर्टर असायचे आणि त्यांच्या माध्यमातून ब्रेक लागले जायचे. आज एअर ब्रेक सेवा सुरू झाली असून वातानुकुलित सेवाही सुरू करण्यात आली आहे. विस्टाडोम प्रवासी डबाही जोडण्यात आला आहे. शतकोत्तरी वाटचालीची साक्षीदार असलेली मिनी ट्रेन जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळविण्यासाठी सज्ज आहे.

कोळसा इंजिनचे रूपांतर डिझेल इंजिन मध्ये
१९०७ ला २० किमी नॅरोगेज मार्गावर अब्दुल हुसैन पीरभाय यांच्या सात वर्षाच्या मेहनतीनंतर मिनीट्रेन सुरू झाली होती. त्या वेळेपासून १९८५ पर्यंत कोळसा इंजिन वापरले जायचे. तदनंतर नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर डिझेल इंजिन माथेरान राणीला घेउन धावू लागले. कोळशाचे इंजिन आजही माथेरान रेल्‍वे स्‍थानकात पर्यटकांना माहिती मिळावी, यासाठी प्रदर्शनार्थ ठेवले आहे.

स्लीपरमध्ये बदल
मिनीट्रेन सुरू झाली तेव्हा रेल्वे रूळाखाली लाकडी स्लीपर होते, कोळसा इंजिन त्यावरून अतिशय जोमात धावत होते. ३५ ते ४० वर्षांपूर्वी लाकडी स्लीपर काढून त्याजागी लोखंडी स्लीपर टाकण्यात आले. हे लोखंडी स्लीपर माथेरानच्या लाल मातीत घट्ट बसत नसल्यामुळे त्यांची जागा आता सिमेंटच्या स्लीपरने घेतली आहे. हे सिमेंटचे स्लीपर लावण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

जागतिक वारशासाठी प्रयत्न
मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडून माथेरान मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळावा म्हणून २०१२ पासून प्रयत्‍न सुरू आहेत. जागतिक वारशाच्या नामांकनात मिनीट्रेनचा उल्‍लेख झाल्‍याने युनेस्‍कोची टीम मध्यंतरी पाहणी करून गेली. मात्र अजूनही जागतिक वारसा मिळालेला नाही.

विस्टाडोमचे आकर्षण
मिनीट्रेनच्या रचनेत ११६ वर्षांत अनेक बदल झाले आहेत. बोगी बदलल्‍या, इंजिन बदलले, रूळाखालील स्‍लीपरही बदलले आहेत.

आता अद्ययावत विस्‍टाडोम बोगी मिनीट्रेनला जोडण्यात आली आहे. या बोगीमधून दोन्ही बाजूला पारदर्शक काचा, तर टपालाही पादर्शक काच असल्‍याने मिनीट्रेनमध्ये बसून घाटरस्‍त्‍याचे, नागमोड वळणे घेत जाणाऱ्या डोंगर-दऱ्यांतचे निसर्गसौंदर्य न्याहाळता येते.

लवकरच हायड्रोजन मिनिट्रेन धावणार
केंद्र सरकारकडून, काही पर्वतीय पर्यटन स्थळावर हायड्रोजन ट्रेन धावली जाणार असल्‍याचे संकेत मिळत आहेत. या पर्वतीय पर्यटन स्थळांमध्ये माथेरानचाही समावेश असून पुढील काही वर्षांत हायड्रोजन मिनीट्रेन धावण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

थंड हवेचे ठिकाण म्‍हणून जगप्रसिद्ध असलेल्‍या माथेरानमध्ये येणाऱ्या ४० टक्‍क्यांपेक्षा जास्त पर्यटक केवळ मिनीट्रेन सफरीचा आनंद घेण्यासाठी येतात. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनात मिनीट्रेनला अनन्य साधारण महत्त्व आहे. काळानुरूप मिनीट्रेनमध्ये बदल होत गेले असले तरी तिचे आकर्षण आणि लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. माथेरानची ही राणी आजही पर्यटकांना भुरळ घालते.
- नारायण कदम, माजी नगरसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com