कल्याण स्कायवॉकवर कचऱ्याचे ढिगारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण स्कायवॉकवर कचऱ्याचे ढिगारे
कल्याण स्कायवॉकवर कचऱ्याचे ढिगारे

कल्याण स्कायवॉकवर कचऱ्याचे ढिगारे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसरात नव्याने उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. नव्याने उड्डाण पूल उभारण्यात येत असतानाच काही वर्षांपूर्वी उभारलेल्या जुन्या उड्डाण पुलाची स्वच्छता व देखभालीकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. कल्याण पश्चिमेकडील स्कायवॉक हा प्रवाशांसाठी नव्‍हे तर फेरीवाल्यांसाठी उभारला आहे का, असा प्रश्न येथील फेरीवाले पाहून पडतो. हे फेरीवाले त्यांच्याकडे जमा होणारा कचरा स्कायवॉक परिसरातच टाकत असल्याने सध्या या परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. याच्‍या दुर्गंधीचा सामना स्कायवॉकवरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना करावा लागत आहे.

कल्याण स्टेशन परिसरातील प्रवाशांची फेरीवाले आणि वाहन कोंडीतून सुटका व्हावी यासाठी २०१०-११ मध्‍ये एमएमआरडीएच्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आला होता. आता स्मार्ट सिटी अंतर्गत हा स्कायवॉक काढून तेथे नव्याने उड्डाण पूल उभारला जात आहे. अनेक ठिकाणी स्कायवॉकचा ढाचा काढण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाला लागून दीपक हॉटेलपर्यंत असलेला ढाचा अद्यापही तसाच असून या स्कायवॉकचा वापर मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी करतात. फेरीवाल्यांचे या स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणात बस्तान आहे. छोटे मोठे विक्रेते, भाजी विक्रेते येथे व्यवसायासाठी बसतात. त्यांच्याकडे जमा होणारा कचरा ते रात्रीच्या वेळेस स्कायवॉक परिसरातच टाकून जातात.
नाक मुठीत घेऊनच प्रवास
स्कायवॉकची स्वच्छता नियमितपणे पालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याने हा दिवसेंदिवस कचरा साचून त्याचे ढीग जमा झाले आहेत. कचरा कुजून त्याला दुर्गंधी सुटल्याने या परिसरातून ये-जा करणे प्रवाशांना नकोसे होते. नाक मुठीत घेऊनच त्यांना प्रवास करावा लागतो. स्कायवॉकवर साचलेल्या कचऱ्याला आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यानंतर पालिकेने एकदा स्कायवॉकवरील कचरा गोळा केला असता ट्रकभर कचरा जमा झाल्याचे पाहायला मिळाले होते.
--------------------
रात्रीच्या वेळेस धोकादायक
स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती एमएमआरडीएकडे होती तोपर्यंत तो सुस्थितीत होता; परंतु पालिका प्रशासनाकडे याची जबाबदारी आल्यानंतर स्कायवॉकची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळाले. स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी यांचे बस्तान असून रात्रीच्या वेळेस महिलांसाठी यावरील प्रवास धोकादायक आहे.
---------------------------
स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने उड्डाण पुलाची उभारणी केली जात आहे. मात्र, सद्यस्थितीत दीपक हॉटेलपर्यंत असलेला उड्डाण पूल हा प्रवाशांसाठी फायदेशीर असून त्याचा वापर प्रवासी करतात. नवीन उड्डाण पूल उभा राहीपर्यंत, पुलाची स्वच्छता देखभाल दुरुस्ती करणे पालिका प्रशासनाचे काम आहे; परंतु ते पालिका प्रशासनाकडून केले जात नाही.
- सुनील धमाले, जागरूक नागरिक.