
सायकल राईडमधून ‘बेटी बचाव...’चा संदेश
ठाणे, ता. १ (बातमीदार) : ठाण्याची जलपरी म्हणून ओळखली जाणारी सई हिने अरुणाचल प्रदेश ते मुंबई असा तीन हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. सईने ३ डिसेंबर रोजी तवंग येथून तिच्या या प्रवासाला सुरुवात केली होती. ३० डिसेंबर रोजी मुंबई गेट ऑफ इंडिया येथे सईने तिच्या या प्रवासाचा शेवट केला आहे. तिचा हा सायकल प्रवास अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातून तब्बल २७ दिवस सुरू होता. तिने आपल्या पूर्ण प्रवासात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ असा संदेश दिला आहे.
ठाण्यातील साकेत येथे तिचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. या वेळी राबोडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घोटेकर, शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, नगरसेवक संजय भोईर, उषा भोईर, विभागप्रमुख अरविंद भोईर, जालिंदर पाटील, भाजप सचिव समीर भोईर, महालक्ष्मी मंदिरचे अध्यक्ष रमेश भोईर, गुरुदत्त साई सेवा मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सईने मनोगत व्यक्त करताना गुरुंचे व आई-वडिलांचे विशेष आभार मानले.
----------------------------
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून शुभेच्छा!
मोहिमेचा ३००० प्रवास करत सई ठाणे शहरात परतली आहे. तिच्या या यशाबद्दल ठाणेकरांनी तिचे वाजतगाजत स्वागत केले आहे. या प्रवासात सईने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सईला पुढील प्रवासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या प्रवासदरम्यान सईने विविध राज्यांतील जीवनमान आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला.