
विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप
विक्रमगड, ता. १ (बातमीदार) : जिल्हा परिषदेच्या कारेल पाडा आणि दुमाड पाडा या शाळेतील विद्यार्थ्यांना आधार युवा प्रतिष्ठानतर्फे शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक यशवंत गिंभल व गावातील पदवीधर तरुण अमोल काटकरी यांच्या हस्ते आधार युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह सर्व दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच आधार युवा प्रतिष्ठानचे अनिकेत अडविलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यात बॅग, दुरेखी वही, चार रेखी वही, बॉक्स वही आदी ३७ प्रकारच्या अनेक शालेय उपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गावातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त साहित्य, तसेच मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील अमोल काटकरी, विशाल दळवी, महेश दुमाडा, उमेश दुमाडा व इतर मान्यवर उपस्थित होते.