
वाहनाच्या धडकेत चालकाचा मृत्यू
नवी मुंबई, ता. १ (वार्ताहर) : घणसोली येथून सायन येथे स्कुटीवरून जाणाऱ्या तरुणाला वाशी खाडी पुलावर एका वाहनाने धडक दिली होती. या अपघातात जखमी स्कुटी चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सायन कोळीवाडा येथे राहणारे मोहित मागो (वय-२७) घणसोली येथील फ्लेअर स्पॉट येथे काम करतात. २३ डिसेंबर रोजी मोहित चुलत भावाच्या गाडीवर कामावर निघाले होते. कामावरून रात्री १२ वाजता सायन कोळीवाडा येथे जाण्यासाठी निघाले असता मध्यरात्री दिडच्या सुमारास मोहित यांच्या गाडीला वाशी खाडी पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोहित यांच्यावर वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, २७ डिसेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी मोहितला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनांविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.