
क्रीडांगणासाठी कामोठेत व्यूहरचना
कामोठे, ता. १ (बातमीदार) : सिडको व पनवेल महापालिकेत सध्या मालमत्ता हस्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अशातच आरक्षित क्रीडांगणासाठी खेळाडू आग्रही असून कामोठे शहरातील क्रीडाप्रेमींनी क्रीडांगणासाठी सनदशीर मार्गाने संघर्षाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नवीन वर्षात क्रीडांगणाच्या अभावामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील खेळाडूंची कुचंबणा थांबेल, अशी आशा आहे.
सिडकोच्या कुचकामी धोरणामुळे सिडको वसाहतीमधील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत. पाणी, रस्ते, गटारांच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त आहेत. सार्वजनिक आरोग्य, परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे. आबालवृद्धांना मोकळा श्वास घेण्यासाठी कुठलीही विकसित बाग नाही. खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण नसल्याने कबड्डी, खो-खो, कुस्ती, क्रिकेट, फुटबॉल, हॉकीसारख्या खेळांमध्ये करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या खेळाडूंना सरावासाठी मुंबई, नवी मुंबई गाठावी लागत आहे. प्रवासासाठी पैसे, वेळ खर्च होत असल्यामुळे खेळाडूंची अडचण झाली आहे. त्यामुळे कामोठेतील क्रीडाप्रेमींनी क्रीडांगणासाठी आता सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले जात आहे. नवीन वर्षात संपूर्ण महापालिका क्षेत्रातील खेळाडूंनी एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती क्रीडाप्रेमी अॅड. समाधान काशीद यांनी दिली आहे.
--------------------------------
एकमेव मैदानावर सिडकोचा डोळा
खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात मोठे मैदान आहे. मात्र, या मैदानात सातत्याने विविध खासगी कार्यक्रम होत असल्यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यावर खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरात वाहतुकीचा ताण वाढणार आहे. वाहनतळाची समस्या भेडसावणार आहे. त्यामुळे या परिसरातील एकमेव मैदान सिडको आंतरराष्ट्रीय बस टर्मिनलसाठी आरक्षित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
------------------------------------
सिडकोने पनवेल महापालिकेला ३० उद्याने हस्तांतरित केली आहेत. आठ उद्यानांची हस्तांतर प्रक्रिया सुरू आहे. कळंबोली नोडमध्ये महापालिका उद्याने विकसित करत आहे. क्रीडांगण आरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर धोरणात्मक निर्णय घेणार आहे.
- जयराम पादीर, मालमत्ता अधिकारी, पनवेल महापालिका
---------------------------------
क्रीडांगणासाठी कामोठे शहरातील खेळाडू, सामाजिक कार्यकर्त्यांनी चळवळ सुरू केली आहे. जनजागृती फेरी, निवेदने, चर्चा सुरू आहे. सिडको, महापालिकेने क्रीडांगणे आरक्षित केली पाहिजे, यासाठी खेळाडू सनदशीर मार्गाचा अवलंब करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
-अॅड. समाधान काशीद, क्रीडाप्रेमी, कामोठे