
वर्तक महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांचा ‘आव्हान - आपत्ती व्यवस्थापन’ शिबिरात सहभाग
विरार, ता. १ (बातमीदार) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आव्हान - आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण’ या राज्यस्तरीय १० दिवसीय निवासी शिबिरामध्ये अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या लक्ष्मी बिपिन सिंग आणि दीपक महाबली जायस्वार हे दोन स्वयंसेवक सहभागी झाले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रत्यक्ष बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापन साधन निर्मिती, आपत्ती व्यवस्थापनासंबंधी जनजागृती अशा अनेक विषयांवर रासेयो स्वयंसेवकांना एनडीआरफच्या प्रशिक्षकांनी सखोल मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या तब्बल १२०० स्वयंसेवकांमधून शारीरिक सक्षमता, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिके असे अनेक निकष पार करून आठ स्वयंसेवक मुलाखतीसाठी निवडले गेले. त्यामध्ये वर्तक महाविद्यालयाची स्वयंसेविका लक्ष्मी सिंग हिची निवड झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी स्वयंसेवकांना साह्य केले.