
चिंचघरमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष
वाडा, ता. १ (बातमीदार) : तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालय व कनिष्ठ महविद्यालयाचा वार्षिक क्रीडा, कला महोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कोरोनामुळे दोन वर्षे कुठलेही शालेय उपक्रम झाले नसल्याने या वर्षी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक संदेश पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे व सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. कुडूस परिसरातील ६० वर्षांचा जुना इतिहास असलेल्या या शाळेने असंख्य गुणी विद्यार्थी घडविले आहेत. यावेळी पालघर जिल्ह्यात नव्हे तर राज्यात शिवव्याख्याती म्हणून लौकिक मिळालेली आणि अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रशंसा केलेली शाळेची विद्यार्थिनी देवयानी घरत या मुलीचा सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थाध्यक्ष मधुकर पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर, वाडा पंचायत समितीचे माजी उपसभापती मंगेश पाटील, सरपंच प्रेमा नांगरे, उपसरपंच मनेश पाटील, कुडूसचे सरपंच राजेंद्र कोंगील, उपसरपंच डॉ. गिरीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते अनंता दुबेले आदी उपस्थित होते.