
पडघ्यात रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पडघा, ता. १ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे साने गुरुजी समाजसेवी शिक्षक संघाच्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘बियरच्या बाटल्या रिकाम्या करण्यापेक्षा रक्ताच्या बाटल्या भरून नववर्षाचे स्वागत करुया’ असा सामाजिक संदेश देत अध्यक्ष प्रशांत भोसले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काठे, कार्याध्यक्ष संतोष जोशी, सचिव अशोक ठाणगे यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर रोजी ग्रामसचिवालयातील सभागृहात हे शिबिर घेण्यात आले. यावेळी ७७ नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. जमा केलेल्या रक्ताच्या पिशव्या छत्रपती शिवाजी महाराज ब्लड बँक, कळवा येथे जमा करण्यात आल्या आहेत. यावेळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत गायकर, माजी उपसभापती गुरुनाथ जाधव, मनसे भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.