
खर्डीत बेवारस गायींना जीवदान
खर्डी, ता. १ (बातमीदार) : खर्डी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या तीन दिवसांत गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे दोन गायींना जीवदान मिळाले आहे. खर्डी गावातील गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या गायीला व खर्डी नाक्यावर इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलेल्या गायीला वाचवण्यात यश आले आहे. एका गायीला चोरट्यांपासून वाचवून; तर एका जखमी गायीला जीवदान देण्याची व माणुसकी दाखवण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी खर्डी पोलिसांनीही मदत केली.
खर्डी गाव परिसरात बेवारस जनावरे कायम फिरत असल्याने येथे वारंवार जनावरे चोरीच्या घटना घडत असतात. या घटनांमुळे अनेक वेळा चोरांना पकडण्यात आले होते. त्यांच्या गाड्या फोडून जाळण्यात आल्या होत्या. त्याबाबत स्थानिक रहिवाशांवर गुन्हेही दाखल झाले होते; परंतु कायद्याच्या पळवाटांमुळे जनावर चोरटे सुटत असल्याचा आरोप गोरक्षक सुनील लकडे यांनी केला आहे.
--------------------
चोराच्या तावडीतून सुटका
खर्डी नाक्यावरील शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. ३) एका गायीला एक वृद्ध इंजेक्शन देत होता. ही घटना तेथून कारने जाणाऱ्या एसके फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील लकडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने गाडी थांबवून गायीला इंजेक्शन देणाऱ्या चोरट्याला अडवले. मात्र तो वृद्ध पळून जाण्यात यशस्वी झाला. या गायीला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन दिल्याचे त्या गायीच्या हालचालीवरून लक्षात आले. त्यांनी तात्काळ खर्डी पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. गाय गुंगीत असल्याने तिला व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यामुळे तिला सुरक्षित स्थळी नेण्याचे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खर्डीतील मित्रांना मदतीला घेऊन त्या गायीला श्री स्वामी समर्थ केंद्रात दाखल केले. या गायीला चोरून नेणारे चोरटे सकाळपर्यंत तिथे फिरकले नसल्याने त्या गायीला कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवण्यात आले.
----------------------
जखमी गायीवर उपचार
एका बेवारस गाईच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ही गाय रक्तबंबाळ स्थितीत गेल्या चार दिवसांपासून फिरत होती. गायीची स्थिती पाहून खर्डीतील गोरक्षक धोंडीराम वाघ यांनी पोलिस पाटील शामबाबा परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या जखमी गाईला गोशाळेत पाठवण्यासाठी श्रीराम दृष्टी गोशाळा धापड (वाडा) येथील गोशाळेचे अर्जुन वाघ आपल्या सहकाऱ्यांसोबत दाखल झाले. त्यांनी जखमी गायीला वाहनामधून गोशाळेत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी प्रवीण अधिकारी, मिलिंद झुंजारराव, प्रीतम वाघ, दाजी सूर्यराव आदींच्या सहकार्याने गायींचे प्राण वाचवण्यात आले.