विधायक उपक्रमातून नववर्षाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधायक उपक्रमातून नववर्षाचे स्वागत
विधायक उपक्रमातून नववर्षाचे स्वागत

विधायक उपक्रमातून नववर्षाचे स्वागत

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १ (बातमीदार) : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे विविध प्रकारे स्वागत करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. अंबरनाथच्या तरुणाईने मात्र रस्त्यालगत पदपथावर थंडीत कुडकुडणाऱ्या गरजूंना ब्लॅंकेटची ऊब देऊन अनोख्या रीतीने थर्टीफर्स्ट साजरा केला; तर वीटभट्टीवरील झाडाखाली भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांची आरोग्य तपासणी करून नववर्षाचे स्वागत केले.
शैक्षणिक, सामाजिक उपक्रमात सहभागी असणाऱ्या द युवा युनिटी फाऊंडेशनच्या युवक-युवतींनी फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश चलवादी यांच्या नेतृत्वाखाली गरजूंना ऊबदार ब्लॅंकेट देऊन त्यांचे थंडीपासून संरक्षण केले. ह्युमन नेटवर्क, एक जरिया, जायन्ट्स ग्रुप यांसारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यातून यंदा अंबरनाथसह उल्हासनगर, कल्याण या ठिकाणी अंदाजे ५०० ब्लॅंकेट्स देऊन नववर्षाचे स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे महेंद्रनगर परिसरातील गरीब, गरजू अशा १८० मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
द युवा युनिटी फाऊंडेशनचे मार्गदर्शक निनाद कासले यांच्या नेतृत्वाखाली फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश चलवादी, खजिनदार सागर माने यांच्या पुढाकाराने नूर शेख, सायमा शेख, सुमन केवट, अंकिता ठोकळ, शशांक वाडेकर, अमन विश्वकर्मा, आदित्य नीलकंठ, रोहित कुंभार, रणजित झा, सिद्धेश माईन, चंद्रकांत लोणे, विवेक, अभिषेक विकास आणि प्रवीण आदी स्वयंसेवकांनी ब्लॅंकेटवाटप उपक्रमात सहभाग घेतला होता.

-------------------
वीटभट्टी येथे आरोग्य शिबिर
फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (ता. १) डंपिंग ग्राऊंडवरील वीटभट्टीवरील मजुरांच्या झाडाखाली भरणाऱ्या शाळेतील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ज्ञानेश्वर आव्हाड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवा दिली. आरोग्य शिबिरात ४० मुले आणि ८० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.