
१५६ तळीरामांवर मुंबईत कारवाई
मुंबई, ता. १ : नववर्षाच्या स्वागतानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या मुंबईतील १५६ तळीरामांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. याशिवाय बेशिस्तपणे वाहन चालवल्याबद्दल ६६ जणांवर; तर विनाहेल्मेट २४६५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा ते रविवारी पहाटेपर्यंत वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. नियम न पाळणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध रस्त्यांवर चेक पॉइंट उभारले होते. या वेळी विनाहेल्मेट २४६५ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. ड्रिंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या १५६ तळीरामांवर; तर ६६ जणांवर बेशिस्तपणे वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट प्रवास केल्याबद्दल २७४ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्या ६७९ वाहनचालकांवरही पोलिसांनी कारवाई केली. तसेच नो-पार्किंग भागात उभ्या असलेल्या ३०८७ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.