
करावे चौकात अपघाताला निमंत्रण
नेरूळ, ता. २ (बातमीदार)ः नेरूळ येथून सीवूडसला जाताना गणपतशेठ तांडेल मैदानाजवळील करावे चौक धोकादायक ठरत आहे. चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांच्या वेगाला आवर घालण्यासाठी येथे कोणतीही उपाययोजना नसल्याने वारंवार अपघातांचे प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगाला अटकाव घालण्यासाठी येथे सर्कल उभारण्याची मागणी होत आहे.
तांडेल मैदान बाजूलाच असलेले ज्वेल ऑफ नवी मुंबई, करावे गाव, नेरूळ व सीवूड्सकरांसाठी असलेले डी मार्ट आणि बाजूला असलेल्या पाम बीच मार्गामुळे नेहमीच या चौकात वाहनांची वर्दळ असते. या चौकाच्या एका बाजूला गतिरोधक असले, तरी त्याची उंची कमी असल्याने भरधाव येणारी वाहने एकमेकांसमोर येण्याचे अनेक प्रसंग येथे घडले आहेत. अशातच तांडेल मैदानात होणारे क्रिकेट सामने, विविध कार्यक्रम, लग्न सोहळ्यांवेळीदेखील अनेकदा पालकांसोबत लहान मुले रस्ता ओलांडून जाताना दिसतात. त्यामुळे या चौकात वाहनांच्या वेगाला मर्यादा घालण्यासाठी काही तरी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे पालिकेने स्वच्छता अभियानातून विविध चौकांत उभारलेल्या शिल्पांप्रमाणे येथेही शिल्प उभारून चौकातील प्रवास सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------
या भागात ज्वेल ऑफ नवी मुंबई, तांडेल मैदान, करावे गाव व नेरूळला जाण्यासाठीचा मार्ग आहे. गजबजलेल्या या चौकात पालिकेने सर्कल उभारणे गरजेचे आहे. कारण करावे गावातील अनेकांचे येथे अपघात झाले आहेत.
- अमित मढवी, सामाजिक कार्यकर्ते, करावे