
हरवलेल्या मुली घरी सुखरूप परतल्या
मानखुर्द, ता. २ (बातमीदार) ः मानखुर्दच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगरातून हरवलेल्या तीन अल्पवयीन मुली रविवारी (ता. १) सुखरूप घरी परतल्या. मानखुर्द पोलिसांनी शिवडीतून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. त्यापैकी दोघी सख्ख्या बहिणी आहेत.
शुक्रवारी (ता. ३०) रात्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर परिसरात राहणाऱ्या ७, ९ व १३ वर्षे वयाच्या मुली घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, परंतु त्या सापडल्या नाहीत. अखेर त्यांनी मानखुर्द पोलिस ठाणे गाठत याविषयी माहिती दिली. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या वेळी त्या तिघी कुर्ला नेहरूनगर परिसरात असल्याची माहिती खबऱ्यांनी पथकाला दिली. पथक त्या ठिकाणी पोहोचण्याअगोदरच त्या तिथून निघून गेल्या होत्या. पथकाने रेल्वे स्थानक परिसर तसेच खेळांच्या मैदानात शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या तिघी शिवडी येथे असल्याची माहिती खबऱ्यांनी दिली. त्या तिघीपैकी सख्ख्या बहिणी असलेल्या दोघी पालकांसोबत त्या परिसरात पूर्वी राहत होत्या. तेथून तिघींना ताब्यात घेऊन मानखुर्द पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी तसेच चौकशी केल्यानंतर त्यांच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. सहायक निरीक्षक संतोष शेलार या प्रकरणाचा तपास करत होते. गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी या मुलींचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.